IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?

MS Dhoni Rishabh Pant, CSK in IPL 2025: प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातील बडी मंडळी फोडून आपल्या गटात घेण्याचा खेळ राजकारणासह IPL मध्येही दिसू लागलाय.

MS Dhoni Rishabh Pant, CSK in IPL 2025: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसतायत. फोडाफोडीचे राजकारण करून विविध पक्षातील बडे नेते आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ लागली आहे.

प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातील बडी मंडळी फोडून आपल्या गटात घेण्याचा हा खेळ केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. फोडाफोडीच्या या राजकारणाचा दुसरा अंक IPL 2025 मध्येही पाहायला मिळतोय.

चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच CSK संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याच्यानंतर CSK ला दीर्घकाळासाठी एका युवा आणि अनुभवी अशा खेळाडूची गरज आहे.

धोनी व्यतिरिक्त चेन्नईच्या संघाने रवींद्र जाडेजा आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंना कर्णधारपद देऊन पाहिले. पण या दोघांच्याही नेतृत्वाखाली CSK संघाला फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

आता आगामी IPL 2025साठी लवकरच खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी खेळाडू रिटेन करणे आणि इतर संघातील खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु आहे.

याचाच एक भाग म्हणून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला आपल्या संघात घेण्यासाठी CSKची धावपळ सुरु आहे. इतकेच नव्हे तर ही बोलणी करण्यासाठी धोनीची मदत घेतली जात असल्याचीही माहिती आहे.

दिल्लीचा कर्णधार म्हणून कायम राहून संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांची निवड करण्यात रिषभ पंतला महत्त्वाची भूमिका बजावण्याची इच्छा आहे. पण संघ व्यवस्थापन मात्र त्याला संघात कायम ठेवण्यात रस दाखवत नसल्याचे चित्र आहे.

दिल्लीच्या संघाकडे रिषभ पंतच्या जागी अक्षर पटेलसारखा नवखा खेळाडू कर्णधारपदासाठी आहे असेही बोलले जातेय. पण तरीही मेगालिलावात दिल्लीचा संघ बड्या खेळाडूवर बोली लावून नवा कर्णधार आणेल असेच चित्र आहे.

अशा परिस्थितीत रिषभ पंतला CSKच्या संघात कर्णधारपद मिळण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण धोनीनंतर पंतची संघातील जागा पक्की राहिल. तसेच ऋतुराजची कॅप्टन्सी गेल्या हंगामात फसल्याने CSK मोठा निर्णय घेऊच शकते.

आगामी IPL 2025 मध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज आणि रिषभ पंत यांच्यातील मध्यस्थाची भूमिका महेंद्रसिंग धोनी पार पाडताना दिसतोय.