Bank of Baroda कडून १ कोटींचं Home Loan: किती पगार असणं आवश्यक? जाणून घ्या पात्रता आणि अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:16 IST2026-02-13T09:03:12+5:302026-02-13T09:16:09+5:30

Bank of Baroda: जर तुमचा घर घेण्याचा विचार असेल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून १ कोटी रुपयांचे होम लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचे मासिक उत्पन्न किती असावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पाहूया यासंदर्भातील माहिती.

Bank Of Baroda Home Loan: स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नोकरी करणाऱ्या वर्गासाठी आता गृहकर्ज घेणं सोपं झालं आहे. मात्र, तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून १ कोटी रुपयांचे होम लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचे मासिक उत्पन्न किती असावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक तुमचं मासिक उत्पन्न, सध्याची कर्जे, क्रेडिट स्कोअर आणि कर्जाचा कालावधी अशा अनेक पैलूंची पडताळणी करते. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १ कोटींच्या कर्जासाठी आवश्यक पगार आणि इतर अटींची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कोणतीही बँक ग्राहकाला गृहकर्ज देण्यापूर्वी त्याचे वय, मासिक उत्पन्न, सध्या सुरू असलेले ईएमआय (EMI) किंवा थकबाकी आणि सिबिल (CIBIL) स्कोअरचं मूल्यांकन करते. जर तुमची कोणतीही थकबाकी नसेल आणि तुमचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर कर्ज मिळणं सोपं होतं.

अशा परिस्थितीत बँक तुम्हाला सुरुवातीच्या किमान व्याजदरात कर्ज देऊ शकते. याउलट, जर सिबिल स्कोअर कमी असेल, तर तुम्हाला महागड्या दराने कर्ज घ्यावे लागू शकते किंवा मंजूर होणारी कर्जाची रक्कम कमी असू शकते.

गृहकर्ज मिळवण्यासाठी निश्चित मासिक उत्पन्न असणे अनिवार्य आहे. जर तुमचं आधीचं कोणतेही कर्ज सुरू नसेल आणि तुम्ही डिफॉल्टर नसाल, तर पुरेसा पगार असल्यास बँक ऑफ बडोदाकडून कर्ज मिळवणं सोपं होऊ शकतं.

समजा तुमची जन्मतारीख १२ फेब्रुवारी १९८६ आहे आणि तुमचा सिबिल स्कोअर ७७१ ते ८०० च्या दरम्यान आहे, तर ७.६५ टक्के व्याजदराच्या हिशोबात २० वर्षांच्या कालावधीसाठी १ कोटींचे कर्ज मिळवण्यासाठी तुमचा किमान पगार १,२५,५०० रुपये असणं आवश्यक आहे. या गणनेनुसार, २० वर्षांसाठी तुम्हाला कमाल १,००,११,७८३ रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्याचा मासिक हप्ता ८१,५७५ रुपये असेल.

सध्याच्या काळात बँक ऑफ बडोदाचं गृहकर्ज ७.२० टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं उपलब्ध आहे. हा दर प्रामुख्यानं अशा ग्राहकांना दिला जातो ज्यांचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा अधिक आहे. परंतु, कर्ज मंजूर करण्याबाबतचा अंतिम निर्णय बँकेचा असतो.