Bhandara Fire: 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा बळी; चौकशी समितीचा 50 पानांचा अहवाल तयार

By मुकेश चव्हाण | Published: January 20, 2021 12:19 PM2021-01-20T12:19:56+5:302021-01-20T16:02:03+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली 9 जानेवारीच्या मध्यरात्री 2 वाजता घडली होती. भंडाऱ्यातील या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशही हळहळला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

संबंधित घटनेच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने 50 पानी अहवाल तयार केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार, शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली, असं समितीने अहवालात स्पष्ट केले आहे.

तसेच चौकशी समितीने दिलेल्या अहवालात 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

संबंधित घटनेच्या वेळी ड्युटीवर तैनात असलेल्या 2 परिचारिकांच्या कामावर ठपका ठेवण्यात आला आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती. तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असं परखड मत समितीने नोंदवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये समिती आपला अहवाल हा भंडारा पोलिसांना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाकडून कुणावर गुन्हा दाखल करायचा आहे, त्याबद्दल नावं जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाचा अहवाल अखेर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी मंगळवारी नागपूरचे विभागीय आयुक्त व चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्याकडून हा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. . विशेष म्हणजे, घटनेला 11 दिवस होऊनही कुणावरच कारवाई झाली नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला पूर्वप्राथमिक अहवाल तीन दिवसांत देण्यास सरकारने सांगितले होते. मात्र समितीने नंतर दिवस वाढवून मागितले. आगीच्या घटनेची चौकशी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समितीचे नेतृत्व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सोपविले.

मंगळवारी सकाळी डॉ. तायडे यांनी हा अहवाल डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सादर केला. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. संजीव कुमार यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, समितीतील काही सदस्य मुंबई येथील आहेत. अहवालावर त्यांची स्वाक्षरी झाल्यावरच सरकारकडे सादर केला जाईल. अहवालबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. समितीमध्ये एवढा मोठा ताफा असतानाही अहवाल सादर करण्यास उशीर झाल्याने शंकेच्या रडारवर असलेल्यांना ‘क्लीन चिट’ मिळते की कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.