१, ३, १५, १६ यापैकी तुमची बर्थडेट कोणती? गुप्त उपाय करा; यश-पैसा-भरभराट लाभेल! करून तर पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:45 IST2026-01-30T09:04:36+5:302026-01-30T09:45:41+5:30
Numerology: तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखेला झाला असेल, तर काही उपाय करणे उपयुक्त ठरू शकते. लकी रंग, लकी वार जाणून घ्या...

Numerology: भारतीय संस्कृतीत ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या सर्वांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल काही अंदाज वर्तवले जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून त्या व्यक्तीचे गुण-दोष, सकारात्मक-नकारात्मक बाजू, जीवनात घडणाऱ्या गोष्टींची भाकिते केली जाऊ शकतात. तसेच ग्रहांची दशा, महादशा, अंतर्दशा, त्याचे होणारे परिणाम याचेही आखाडे बांधले जाऊ शकतात.

Numerology Prediction For Mulank 1, 3, 6 And 7: नक्षत्रांची मिळून रास तयार होत असते. नवग्रह राशींसह नक्षत्र गोचरही करत असतात. नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य, प्रभाव, परिणाम वेगवेगळे असतात. नवग्रहांतील प्रत्येक ग्रह महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्राची एक शाखा असलेले अंकशास्त्र हेही प्रभावी मानली जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.

अंकशास्त्रात १ ते ९ अंकांमधून मूलांक काढला जातो. या प्रत्येक मूलांकाचे स्वामित्व नवग्रहातील एक-एक ग्रहांना देण्यात आले आहे. असे बरेच लोक आहेत जे अत्यंत प्रतिभावान असूनही यशाच्या शिखरावर पोहोचण्यात खूपच कमी पडतात. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्ती जन्म तारीख ही फक्त एक संख्या नाही, तर ती जीवनातील अनेक गोष्टींचे सूचक आहे. यश-प्रगती, विजय आणि पराजय यांचे संकेत आहे.

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखेला झाला असेल, तर तुमच्याकडे सूर्य आणि गुरु ग्रहांची अद्भुत ऊर्जा आहे, परंतु काही गुप्त अडथळे यश-प्रगतीचा मार्ग खडतर करतात, असे म्हटले जाते. एकीकडे या व्यक्तींकडे अतुलनीय नेतृत्व क्षमता असते; तर दुसरीकडे, या लोकांची सर्वांत मोठी कमतरता म्हणजे त्यांचा फोकस कायम राहत नाही.

मूलांक १ चा स्वामी हा नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह आहे. तर मूलांक ३ चा स्वामी हा नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह आहे. तसेच १५ या तारखेतील १ आणि ५ ची बेरीज केली, तर ६ उत्तर येते. मूलांक ६ चे स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे. तसेच १६ या तारखेतील १ आणि ६ यांची बेरीज केली, तर उत्तर ७ येते. छाया, मायावी, क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहु-केतु यांपैकी केतुचे स्वामित्व मूलांक ७ वर आहे.

महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचे दुर्गुण म्हणजे या व्यक्ती लवकर त्यांचा संयम गमावतात. ओळख आणि प्रसिद्धीच्या मागे लागतात, पण त्यांचे लक्ष अनेकदा मधेच भरकटते. यामुळे त्यांनी आधीच पूर्ण केलेले काम बिघडू शकते किंवा त्याची किंमत कमी होऊ शकते. जर त्यांनी लक्ष केंद्रित करून कामे केली तर या व्यक्ती मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात.

महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आणि चांगले गुण म्हणजे, या लोकांनी आपले लक्ष केंद्रित करून कामे केली तर ते आयुष्यात भरपूर संपत्ती, आदर, मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळवू शकतात. हे लोक मीडिया, पब्लिक डीलिंग, मार्गदर्शन, कोचिंग, अध्यापन, सर्जनशील क्षेत्रे, क्रीडा इत्यादी क्षेत्रात चांगले करिअर करू शकतात. त्यांच्या नातेसंबंधांमध्ये उच्च अपेक्षा असतात. या तारखेला जन्मलेले लोक आकर्षक असतात. त्यांचे व्यक्तिमत्व चांगले असते, म्हणूनच लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात.

महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींनी काही उपाय करणे अत्यंत उपयुक्त, रामबाण ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून तुपाचा दिवा लावा. यानंतर, दोन मिनिटे डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. असे केल्यास एकाग्रता वाढू शकते. विचार वाढीस लागू शकतात. भविष्य घटनांचा वेध घेण्याची क्षमता वाढीस लागू शकते. रविवारी सूर्याला जल अर्पण करा. गुरुवारी पिवळी डाळ आणि पिवळे कपडे दान करा. शक्य असेल तर दररोज मंदिरात जावे. या लोकांनी त्यांच्या अहंकारावर नियंत्रण ठेवले आणि शिस्त राखली तर ते उच्च पातळीचे यश मिळवू शकतात. तसे केले नाही तर त्यांची काहीही साध्य करण्याची क्षमता आणि धाडस वाया जाईल.

महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींसाठी लाल रंग लकी ठरू शकतो. यामुळे आत्मविश्वास आणि शक्ती मिळू शकते. पांढरा रंग भाग्यकारक ठरू शकतो. यामुळे शांतता लाभू शकते. आकर्षण निर्माण करते. तर पिवळा रंग गुरुबळ देऊ शकतो. यामुळे ज्ञान आणि ऊर्जा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.

महिन्याच्या १, ३, १५ किंवा १६ तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींसाठी कोणत्याही महिन्याची १, ३, ५, ६, २, १० आणि १२ तारखा लकी ठरू शकतात. रविवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस भाग्यकारक ठरू शकतात. तसेच, कोणतेही महत्त्वाचे काम रविवार किंवा गुरुवारी सुरू करणे अनुकूल, सकारात्मक, शुभ ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम ।। हा नवग्रह स्तोत्रातील रविचा मंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. तसेच ऊँ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।, हा रविचा गायत्री मंत्र आहे. याचा जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते. अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते.

देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. गुरुच्या नक्षत्रात केलेले हे दान अधिक शुभफलदायी मानले जाते. गुरु यंत्राची स्थापना, पूजन करावे. तसेच गुरुचे रत्न पुष्कराज शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. रुद्राक्षही धारण करता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.

हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥, हा शुक्राचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे. कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र दान करावे. शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे. तसेच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन शुक्र रत्न हिरा धारण करावा, असे काही उपाय सांगितले जातात.

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्। रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥ हा केतुचा नवग्रह स्तोत्रातील श्लोक आहे. ॥ॐ केम केतवे नमः॥ हा केतुचे बीज मंत्र आहेत. केतुचा कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर केसर किंवा हळद यांचा टिळा लावावा. वृद्ध व्यक्ती, गरजूंची मदत करावी. वडील आणि वृद्धांची सेवा करावी. तसेच केतु दोष निवारणासाठी केतुचे रत्न लसण्या (Cat's Eye) धारण करावे, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















