साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:40 AM2024-05-12T10:40:33+5:302024-05-12T10:51:09+5:30

Weekly Horoscope: १२ मे २०२४ ते १८ मे २०२४ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात रवीचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी रवी, बुध, शुक्र आणि हर्षल मेषेत आहेत. दि. १४ रोजी रवी वृषभेत जाईल. तेथे त्याची युती गुरुशी होईल. क्लू कन्येत, प्लूटों मकरेत, तर शनी कुभेत आहे. मंगळ, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. १२ रोजी आदि शंकराचार्य जयंती, १३ पासून श्री नृसिंह नवरात्र सुरू होत आहे. १४ रोजी गंगापूजन, तर १५ रोजी दुर्गाष्टमी आहे.

सूर्याची वृषभ संक्रांती, गुरु-सूर्याचा युती योग तसेच अन्य विविध शुभ योगांनी आगामी काळ समृद्धी, सुखकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना हा काळ अधिक लाभदायी ठरू शकेल, ते जाणून घ्या...

मेष: या आठवड्याच्या अखेरपर्यंत कारकीर्द, व्यवसाय, परीक्षा, स्पर्धा इत्यादींशी संबंधित चांगली बातमी मिळेल. जर अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. भावंडाना भेटण्याची संधी मिळेल. थकवा, आळस व ऋतुजन्य आजार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. जर मिळालेल्या संधीचा लाभ घेतला नाहीत तर अनेक दिवस पुन्हा संधी मिळण्याची वाट पाहावी लागेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. कनिष्ठ पूर्ण सहकार्य करतील. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्त होईल. राजकारणी व्यक्तींना मोठे पद, प्रशंसा व सन्मान मिळण्याची संभावना आहे. प्रेम संबंध दृढ झाल्याने आपसातील विश्वास वृद्धिंगत होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. मुलांकडून सुखद बातमी मिळू शकते.

वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. त्याच्या प्रभावामुळे कार्य व व्यापार जोशपूर्वक कराल. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट सुखावून जाईल. वैवाहिक जीवनाशी संबंधित एखादी समस्या त्रस्त करण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांची बदली नावडत्या ठिकाणी झाल्याने तणावास कारणीभूत होऊ शकते. सावध रहावेच लागेल. वाणी व व्यवहारात संयमित राहण्याची गरज आहे. अचानकपणे येणाऱ्या गुप्त शत्रूंपासून सावध राहा. नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी प्रेमिकेच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. कार्यक्षेत्रात बेफिकीर राहून चालणार नाही. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. योजनांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्याची संभावना असून कष्टप्रद होऊ शकते. एखादी घरगुती समस्या महिलांसाठी तणावाचे कारण होऊ शकते. त्याचे निराकरण करण्यासाठी एखाद्या बाहेरील व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. बाहेरील व्यक्ती मोठी भूमिका बजावेल. वाणी संयमित ठेवावी. अनावश्यक वाद टाळावेत. लहान-सहान गोष्टींना मनात थारा देऊ नये. व्यापारी वर्गाचे व नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे काम सामान्यपणे चालेल. मन प्रसन्न होईल. व्यापारी वर्गात नवीन उत्साह निर्माण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. कदाचित बाजारातील थकबाकी मिळेल. कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायी होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल.

कर्क: स्वतःहून कामे करावी लागतील. इतरांवर अवलंबून राहिल्यास स्वतःच्या आत्मविश्वासाच्या अभावाचा सामना करावा लागू शकतो. पूर्वार्धात सहकाऱ्यांची किंवा प्रिय व्यक्तीची मदत न मिळाल्याने मन खिन्न होईल. समस्यांचे निराकरण होत असल्याचे दिसू लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी वरिष्ठ व कनिष्ठ यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावयास हवा. उत्तरार्ध शुभ फलदायी असल्याचे दिसते. उत्साह व पराक्रम पराकोटीस गेलेला असेल. धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सन्मान प्राप्ती संभवते. प्रेम संबंध दृढ होऊन एकमेकातील विश्वास वाढेल. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल.

सिंह: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. शुभदायी व सौभाग्यप्रद फले एकाच वेळी प्रदान करणारा आहे. असे असले तरी चुकून उत्साहित होऊन शुद्ध हरवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा होऊ घातलेली कामे बिघडू शकतात. कुटुंबीय व प्रियजनांच्या सहवासात हास्य-विनोद करताना मर्यादेचे पालन करावे. वाणी चारित्र्य दर्शविते याची जाणीव ठेवून कोणाचाही अपमान करू नये, अन्यथा चांगल्या संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास लक्षपूर्वक केल्यास उत्तम यश प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून त्रासदायी ठरलेल्या समस्येचे निराकरण होईल. सुखावून जाल. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल.

कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. अतिरिक्त कामाचा भार येऊ शकतो. कौटुंबिक समस्या त्रस्त करू शकतील. अशा परिस्थितीत कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई न करता शुभचिंतकांचे मार्गदर्शन घेतल्यास एखादे निश्चित उद्धिष्ट प्राप्त करू शकाल. कोणत्याही आव्हानांचा सामना करताना हे लक्षात ठेवावे की जसे दिवस चांगले नाहीत तसेच हे वाईट दिवस जास्त काळ टिकणारे नाहीत. जीवनात अडचणी प्रभाव कमी करत असल्याचे आपणास जाणवेल. कठीण काळात वैवाहिक जोडीदार सावलीप्रमाणे उभा राहील.

तूळ: आठवड्याचा पूर्वार्ध अत्यंत लाभदायी आहे. नशिबाची साथ मिळत असल्याचे दिसून येईल. उत्साह व आत्मविश्वास उंचावेल. असे झाल्याने सर्व कामे योग्य प्रक्रारे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा सन्मान व पद उंचावणारा होऊ शकतो. काही जवाबदारी टाकण्यात येऊ शकते. एखादी कुटुंबिक समस्या आपल्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. परंतु विवेकबुद्धीने निराकरण करण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मोठी उपलब्धी प्राप्त होऊ शकते. त्यांची आवडत्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नती होण्याची संभावना आहे.

वृश्चिक: हा आठवडा कामे पूर्ण करणारा असला तरी चुकीमुळे कामात बिघाड होण्याची शक्यता आहे. वाणी व व्यवहार यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपणच आपले काम करू शकता किंवा बिघडवू शकता याची जाणीव ठेवावी. अशा वेळी कोणताही निर्णय विचार पूर्वकच घ्यावा. कार्यक्षेत्री जे काही नवीन करावयाचे आहे त्याची वाच्यता करू नये अन्यथा विरोधक त्यात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. जर भागीदारीत एखादा व्यवसाय करावयाचा असेल तर आर्थिक गुंतवणूक, कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी आधी पूर्ण करूनच पुढे व्हा. प्रकृती व सामान याकडे विशेष लक्ष द्यावे. वैवाहिक जोडीदाराच्या भावना व गरजा याकडे दुर्लक्ष करू नये. कठीण प्रसंगी जोडीदारास बरोबर असलेला बघाल.

धनु: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी व सौभाग्यवर्धक आहे. ज्या कामांची योजना अनेक दिवसांपासून करत होता ती कामे वेळेवर पूर्ण झाल्याने प्रसन्न व्हाल. नोकरी व व्यापार अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या बातम्या मिळतील. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून जास्त आर्थिक फायदा होण्याची संभावना आहे. नव्याने आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी लाभदायी आहे. असे असले तरी कोणत्याही नवीन योजनेत पैसा गुंतविण्यापूर्वी शुभचिंतकांचा व आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेण्यास विसरू नये. जो काही पैसा आला आहे त्याचा अहंकार इतरांसमोर प्रदर्शित करू नका. सर्वांचा योग्य मान राखावा. राजकारणात असलेल्या व्यक्तींना मोठे पद किंवा जवाबदारी देण्यात येऊ शकते. स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. दांपत्य जीवन सुखद होईल. प्रेम संबंधात माधुर्य व विश्वास वृद्धिंगत होऊ लागेल.

मकर: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. कोणतेही कार्य घाई घाईत न करण्याची खबरदारी घ्यावी. विशेषतः व्यापाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी. कारकिर्दीशी संबंधित कोणतेही कार्य भावनेच्या भरात व घाई घाईत करू नये, अन्यथा होऊ घातलेली कामे बिघडण्याची संभावना आहे. धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. मनाप्रमाणे जर आपल्या जीवनात गोष्टी होत नसतील तर क्रोधावर नियंत्रण ठेवा. असे न केल्यास जे काही आहे ते गमावून बसाल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ यांच्याशी जुळवून घ्यावे. अनावश्यक वाद टाळा. व्यापाऱ्यांनी व्यापार वृद्धी करताना इतरांवर गरजे पेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल उचलावे. प्रेमाचे प्रदर्शन करणे टाळावे. वैवाहिक जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्यासाठी थोडा वेळ जरूर काढा.

कुंभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. मात्र, स्वतःला भौतिक साधनांनी सुसज्ज करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित वस्तूंच्या खरेदीत जास्तीचा पैसा खर्च होऊ शकतो. कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. हे प्रवास सुखद व लाभदायी होतील. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्री तसेच जवळच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो. कौटुंबिक समस्यांचे निराकरण करताना कुटुंबियांच्या भावना व वरिष्ठांचे सल्ले दुर्लक्षित करू नये. एखाद्या महत्वाच्या निर्णयासाठी सल्ला घ्यावा लागेल. घाई करू नये. मनाप्रमाणे गोष्टी न घडल्याने मन खिन्न होऊ शकते. वैवाहिक जोडीदारासह केलेली तीर्थयात्रा, प्रेम व विश्वास वृद्धिंगत करत असल्याचे दिसेल.

मीन: हा आठवडा चांगली बातमी देणारा आहे, ज्यात शुभता व सौभाग्य वृद्धिंगत होईल. नशिबाची साथ मिळत असल्याचे जाणवेल. परिणामतः वरिष्ठांशी सामंजस्य स्थापित होईल. मनाप्रमाणे बदली किंवा पदोन्नती प्राप्त करू शकाल. एखादा महत्वाचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे उपयुक्तता व समर्थन प्रशंसित केली जाईल. सन्मानात वाढ होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांना लाभदायी आहे. मित्र व शुभचिंतकांच्या मदतीने व्यवसाय वृद्धी करण्याची संधी प्राप्त होईल. कौटुंबिक बाबीत चांगली बातमी प्राप्त होईल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दांपत्य जीवन सुखद होईल. गोडवा व विश्वासाचे बंधन वाढतच जाईल.