August 2021 Vrat and Festival: श्रावण मासारंभ, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती; ‘हे’ आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:39 AM2021-07-31T07:39:58+5:302021-07-31T07:46:01+5:30

August 2021 Vrat and Festival: मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे, तितकेच शास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्याही असल्याचे सांगितले जाते.

मराठी वर्षातील सर्वाधिक व्रत-वैकल्ये असणारा एक धार्मिकदृष्ट्या अतिशय शुभ आणि पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण. ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी करण्यात येतील.

मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे, तितकेच शास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्याही असल्याचे सांगितले जाते. चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना म्हणूनही श्रावण महिन्याकडे पाहिले जाते.

ऑगस्ट महिन्यात मंगळागौरी,कामिका आणि पुत्रदा एकादशी, भारताचा स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे महत्वाचे सण साजरे होणार आहे. एकंदरीतच श्रावण महिना व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेला आहे. त्यामुळे उत्सवी वातावरण, नवचैतन्याने आनंद द्विगुणित होणार आहे.

कामिका एकादशी - आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशी श्रीविष्णूंच्या आराधना, उपासनेसाठी उत्तम तसेच शुभ दिवस मानला जातो. या वर्षी बुधवार, ४ ऑगस्ट २०२१ रोजी कामिका एकादशी आहे. प्राचीन ग्रंथांनुसार, कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवऋषी नारदांना सांगितले आहे. चातुर्मास सुरू झाल्यानंतर येणारी ही पहिली एकादशी आहे.

दीप अमावास्या - चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते. रविवार, ८ ऑगस्ट २०२१ रोजी दीप अमावास्या आहे. प्रत्येक कुटुंबीयांना सुख, शांती, समृद्धी, समाधान, लाभ मिळावा, यासाठी दर महिन्याच्या अमावस्या व पौर्णिमेला रात्री दीपपूजन अवश्य करावे, असे सांगितले जाते.

श्रावण मासारंभ - भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. सोमवार, ९ ऑगस्ट २०२१ रोजी श्रावण महिना सुरू होईल. श्रावणामध्ये दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला तसेच प्रत्येक दिवशी येणारी व्रते विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

नागपंचमी - नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नाग देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी शुक्रवार, १३ ऑगस्ट २०२१ रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली, असे मानले जाते.

पुत्रदा एकादशी - श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या वर्षी बुधवार, १८ ऑगस्ट २०२१ रोजी पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे.

नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन - श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. रविवार, २२ ऑगस्ट २०२१ रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. कोळीबांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचा हा सण मानला जातो. बहिण आपल्या भावाला राखी बांधते.

संकष्ट चतुर्थी - गणेश भक्त आणि उपासकांसाठी संकष्ट चतुर्थी हा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. बुधवार, २५ ऑगस्ट २०२१ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत आचरिले जाते.

श्रीकृष्ण जयंती - श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे.

गोपाळकाला - महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करतात. ३१ ऑगस्ट या दिवशी गोपाळकाला साजरा केला जाईल. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे कोरोना संकटामुळे दहीहंडी उत्सव थोडक्यात साजरा होईल.