Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार, मुंग्या, पाली, तसेच चिमण्यांचे घरात येणे हे तर भाग्योदयाचे लक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:46 IST2025-02-13T11:40:56+5:302025-02-13T11:46:14+5:30

Vastu Shastra: काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी बालपणापासून आपल्याला मुंग्यांची ओळख झाली आहे. काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंख मारून जातात, त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांना ही उपाधी दिली असावी. अशा मुंग्यांचे घरातील अचानक गमन-आगमन काही संकेत देते. तसेच बघायलाही नकोशी वाटणारी पाल लक्ष्मीकृपेचे चिन्ह दर्शवते आणि चिमण्यांचे आगमन काय सांगते, ते समजून घेण्यासाठी वास्तू शास्त्राचा आधार घेऊया.

काळ्या मुंग्या येणे हे सुबत्तेचे लक्षण मानले जाते. साखरेचा डबा घरात असूनही त्याला रोज मुंग्या लागत नाहीत, मात्र अचानक कधीतरी रेशनच्या दुकानाबाहेर रांग लागावी तशी साखरेच्या डब्याला मुंग्याची रांग लागलेली असते. ती शुभ आहे. वास्तुशास्त्र सांगते या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर घालावी, त्या तृप्त होऊन आपला मार्ग बदलतात. त्यांच्या आगमनाने घरात शुभ वार्ता येते.

तांदुळाच्या डब्याला काळ्या मुंग्या लागत असतील तर तेही शुभ लक्षण आहे असे वास्तू शास्त्र सांगते. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे ते चिन्ह आहे. अशा वेळी मुंग्यांना साखर घालावी.

साखरेला किंवा गुळाच्या ढेपेला मुंग्यांचे चिकटणे सामान्य आहे, परंतु एखादा खाद्यपदार्थ पडलेला असताना काळ्या मुंग्या त्याला चिकटलेल्या दिसल्या किंवा तो पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानले जाते. नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये प्रगती होते.

याउलट लाल मुंग्या दिसणे अशुभ मानले जाते. भांडणं, संकट, वित्त हानीचे ते लक्षण आहे. त्यांना उपाशी न मारता गव्हाचे पीठ खाऊ घालावे. पीठ खाऊन झाल्यावर मुंग्या फार काळ तिथे टिकत नाहीत व आपला मार्ग बदलतात.

मुंग्या कोणत्या बाजूने येतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभ वार्ता आणतात, पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात, दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजू भक्कम होण्याचे चिन्ह दर्शवतात तर उत्तर दिशेने येणाऱ्या आनंदाची चाहूल देतात.

घरात तीन पालींचे एकत्र दिसणे हे लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानले जाते. पाल हा कीटक खाणारा प्राणी आपल्याला शिसारी आणणारा असला तरी तीन पालींचे एकत्र दिसणे वास्तू शास्त्रानुसार शुभ मानले जाते.

आपल्या अंगणात, खिडकीत पाणी पिण्यासाठी, दाणे टिपण्यासाठी चिमण्या येतात, पण जेव्हा त्या रोजच्या सरावाने घरातही विश्वासाने बागडतात, तेव्हा त्यांची किलबिल वास्तू शास्त्रानुसार अतिशय शुभ मानली जाते. पैशांशी संबंधित शुभवार्ता कळू शकते.