Utpatti Ekadashi 2023: उत्पत्ती एकादशीला जुळून येतोय एक खास योग; दिलेले उपाय केले असता होईल धनलाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:42 PM2023-12-08T12:42:28+5:302023-12-08T12:45:24+5:30

Utpanna Ekadashi 2023: कार्तिक कृष्ण एकादशी ही उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. कळत नकळत होणाऱ्या पापांचे क्षालन करणारी ही एकादशी आहे. या जन्मातलेच नाही तर मागील जन्मातलेही पाप या एकादशीच्या व्रताने संपुष्टात येते असा या एकादशीचा महिमा सांगितला जातो. यंदा ९ डिसेंबर रोजी हे व्रत केले जाईल. या तिथीला उत्पन्ना मातेने अवतार घेतला होता म्हणून ही एकादशी तिच्या नावेही ओळखली जाते.

उत्पत्ती वा उत्पन्ना एकादशीची सुरुवात ८ डिसेंबर रोजी होणार असून ९ डिसेंबर रोजी एकादशी व्रत केले जाणार आहे. मात्र सुरुवात शुक्रवारी झाल्याने आणि उत्पन्ना देवीच्या अवताराची तिथी व देवीचा प्रिय वार शुक्रवार आल्याने या दिवशी केलेले उपाय नक्कीच फलदायी ठरतील. ते उपाय कोणते ते जाणून घेऊ.

ज्योतिष शास्त्र सांगते, की यादिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना पंचामृताने अभिषेक करा आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करताना तुळशीचे पान अर्पण करा. असे केल्याने त्या दोहोंची कृपा होऊन तुमच्या आर्थिक मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल.

एकादशीची तिथी सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत म्हणजे ८ आणि ९ डिसेंबर रोजी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तुळशी ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते. ती जशी विष्णूंना प्रिय आहे तशीच ती लक्ष्मीलाही प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या तिथीला सायंकाळी न विसरता लावलेला दिवा लाभदायी ठरेल.

एकादशीला विष्णू पूजा आपण करतोच, त्या दिवशी आपल्या समईच्या पाचही कडांना पाच वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते. किंवा तुमच्याकडे पंचारतीचा दिवा असेल तर त्यातही तुपाच्या वाती लावून विष्णूंना ओवाळले असता ती परिपूर्ण पूजा मानली जाते. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात.

उत्पत्ती एकादशीला विष्णू पूजेबरोबर शंखपुजाही करा. शंख नादामुळे घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि विष्णूंचा वास आपल्या घरात राहतो. अकारण होणारे कलह, वाद, आजारपण यातूनही सुटका हवी असेल तर रोजच्या देव पूजेत शंखपुजा करा आणि एकादशीला शंखपुजा करून तो दक्षिण दिशेने ठेवा.

हिंदू धर्मात दानाचे महत्त्व अधिक आहे. अन्नदान, वस्त्र दान, जलदान इ प्रकारचे दान गरजू व्यक्तीला केले असता शतपट पुण्य लाभते. म्हणून एकादशी सारख्या तिथीच्या औचित्याने यथाशक्ती दान धर्म करावा. सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे थंडीपासून बचाव करणारे कपडे, औषधं, जीवनावश्यक वस्तूंचे दान केल्यास विष्णू कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाच्या संधी वाढून आर्थिक स्थिती मजबूत होते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.