Swami Samartha: ५ गुरुवार 'या' ५ गोष्टींचे दान करा; स्वामीकृपेने आयुष्यातले अडथळे दूर सारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:58 IST2025-03-06T10:55:39+5:302025-03-06T10:58:37+5:30
Swami Samartha: गुरुवार गुरुभक्तीचा! स्वामी उपासक, दत्त उपासक, गुरु उपासक सातत्याने गुरुमंत्राचा जप करत असतात, या उपासनेला जोड द्यावी पुण्यकर्माची! ते कसे कमवायचे? तर दान धर्म करून! यासाठी फार खर्च करावा लागणार नाही, फक्त न चुकता पाच गुरुवार हा उपचार करावा असे दत्त उपासनेत म्हटले आहे.

गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच, शिवाय ऊर्जा देणाराही आहे. ती आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते. अध्यात्मात अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूंचे दान करून आयुष्यातील अडथळ्यांवर मात करता येणार आहे; कसे ते पाहू.
गुरुवारी आपण दत्त दर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंच्या मठात जातो. मात्र, त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे. आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी ११ च्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे. पुढे दिल्याप्रमाणे पाच गुरुवार पाच गोष्टींचे दान करायचे आहे.
पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे. यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील गुरवांना पितांबर दान करू शकतो, तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही, त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउजपीस त्यांच्या पत्नीला दान करावे.
दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो, तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल.
तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरुंना वाहावीत. त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने वाहावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा.
चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा. त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सन्निध पोहोचतो.
पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक एक घास प्रसादरुपी वाटावी अथवा एखाद्या गरजवंताला दान करावी. एखादे कार्य पूर्णत्त्वास गेले असता पुरणा-वरणाचा नैवेद्य आपण दाखवतो. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा.
सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते. तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावी.