बुधादित्य गोचर: ९ राशींना यश-प्रगतीची संधी, ३ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:05 AM2023-09-15T10:05:54+5:302023-09-15T10:15:39+5:30

सूर्याचे नक्षत्र गोचर आणि बुधाचा उदय काही राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. सूर्याचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे स्वामित्व सूर्याकडे आहे. हा एक शुभ योग मानला जात आहे. कारण सूर्य स्वगृही म्हणजेच आपले स्वामित्व असलेली रास आणि नक्षत्रात विराजमान आहे.

तसेच दुसरीकडे नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध याच सिंह राशीत उदय होत आहे. एखादा ग्रह सूर्याच्या जवळच्या अंशावर असताना दृष्टिआड होतो. त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. मात्र, सूर्यापासून लांबच्या अंशांवर केल्यावर तो दिसू लागतो. बुध हा सूर्यापासून लांबच्या अंशांवर गेल्यामुळे बुध उदय झाला आहे.

सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येतो. सूर्याचा उत्तरा नक्षत्रातील प्रवेश आणि बुधाचा उदय या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकेल? कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष: या काळात कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. धीर धरूनच तुम्ही नुकसान टाळू शकता. नोकरीत पदोन्नती मिळू शकते, परंतु तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. अनियमितता टाळण्याचा प्रयत्न करा. कामाला प्राधान्य द्या. नियमित व्यायाम आणि सकस आहाराचे पालन केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.

वृषभ: ग्रहांचा प्रभाव बुद्धिमत्ता आणि नोकरीशी संबंधित स्पर्धांमध्ये मदत करेल. अविवाहित असाल तर चांगले स्थळ येऊ शकेल. मनोबल उंचावेल. शैक्षणिक क्षेत्रातही हा काळ शुभ राहील. सुधारणा होईल. नवीन माहिती मिळू शकेल. खेळ, कला आणि इतर मनोरंजनाचा आनंद घ्याल. सर्जनशीलतेची शक्ती वाढेल. नवीन प्रकल्पांमध्ये क्षमता दाखवू शकाल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा आणि सल्ला घ्या. या काळात कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील.

मिथुन: करिअरकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळू शकेल. प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकेल. प्रभाव वाढेल. वेळोवेळी आव्हानांना सामोरे जावे लागेल. परंतु कठोर परिश्रम आणि संघर्ष यश मिळवून देईल. हुशारीने खर्च करा. आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बजेट तयार करा. कौटुंबिक कोणत्याही बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ द्या आणि धीर धरा. नियमित व्यायामामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते.

कर्क: ग्रहांचा शुभ प्रभाव नवीन उत्साह आणि संधी घेऊन येईल. करिअरच्या क्षेत्रात यशाकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. उत्पन्न वाढू शकते. नवीन आर्थिक स्त्रोतांची संधी मिळू शकते. जोडीदाराचे नाते घट्ट होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यात आनंद आणि समाधान मिळेल. तुमच्या विचारसरणीचा योग्य वापर करून कोणतीही समस्या सोडवू शकता.

सिंह: आर्थिक बाबींमध्ये बदल आणि स्थिरतेकडे लक्ष द्यावे. गुंतवणुकीतून नफा होऊ शकेल, पण विचार करूनच गुंतवणूक करा. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात सुख-शांतता येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बंध दृढ होतील. काही कौटुंबिक समस्येवरही उपाय सापडेल. जोडीदारासोबतच्या नात्यात समजूतदारपणा आणि गोडवा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन योजना बनवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चय ठेवा.

कन्या: राशी स्वामी बुध उदय होत आहे. बुधाचा उदय नवीन सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरू शकेल. आत्मविश्वास बळकट होईल. करिअरमध्ये नवीन टप्प्यात प्रवेश करू शकाल. कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या परिणामी, प्रतिष्ठा आणि यश मिळेल. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता आणि समज असणे आवश्यक आहे. संबंध मजबूत करण्यासाठी, सहकार्य आणि समजूतदारपणा संवादात महत्त्वाची भूमिका बजावेल. आर्थिक दृष्टिकोनातून सावधगिरीने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. आर्थिक परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी नवीन योजनांची आवश्यकता असू शकते. सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोन मजबूत असेल. चिंता आणि काळजीसाठी ध्यान आणि योगाभ्यास करणे योग्य ठरेल.

तूळ: ग्रहांच्या प्रभावामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. विचार आणि कल्पना आता अधिक विस्तारीत होतील. स्वतःला नवीन दृष्टीकोनातून पाहू शकाल. नोकरी आणि व्यवसायात हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. कौशल्याचा पुरेपूर वापर करून संघर्षाला सामोरे जावे लागेल. परंतु संयम आणि मेहनतीने यश मिळवू शकता. कामांचे नियोजन अतिशय योग्य कसून योजना करा आणि योग्य वेळी पावले उचलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा ताबा घ्यावा लागेल आणि नियोजितपेक्षा तुमचे खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

वृश्चिक: ग्रहांच्या या स्थितीमुळे प्रेम आणि नातेसंबंधांत अनेक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला असू शकतो. सामाजिक जीवनात आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. मित्राकडून आर्थिक मदत मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रातही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकेल. नियोजनात समाविष्ट केले जाईल. शारीरिक आणि मानसिक स्थितीची काळजी घ्यावी लागेल. जास्त ताण आणि मानसिक चिंता तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

धनु: करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. कठोर परिश्रम आणि प्रयत्न अनुकूल परिणाम देऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांशी आणि बॉसशी घट्ट नाते निर्माण करा. व्यवसाय उद्योगात नवीन क्षेत्रे शोधण्याची हीच ती वेळ आहे. काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम काळजीपूर्वक तपासा आणि सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीला महत्त्व द्या. कौटुंबिक बाबींसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. प्रियजनांसोबत वेळ घालवण्यास मानसिक आरोग्य सुधारेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.

मकर: जीवनात नवीन शक्यतांचे संकेत मिळतील. ध्येय साध्य करण्यासाठी त्यागवृत्ती ठेवा. हा काळ करिअरसाठी स्पर्धात्मक ठरू शकतो. मेहनतीने आणि समर्पणाने प्रोजेक्ट्स यशाकडे नेऊ शकता. कामाच्या ठिकाणी नवीन शोध लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे करिअरला नवी दिशा मिळू शकेल. आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बजेटचे काळजीपूर्वक नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैयक्तिक दृष्टीकोनातून, हा काळ एक महत्त्वपूर्ण वळण घेऊ शकतो. जोडीदार आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने शांतता आणि आनंद मिळेल.

कुंभ: या काळात करिअरमधील नवीन प्रकल्पांसाठी सज्ज व्हा. क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. काही लोकांशी मतभिन्नता असू शकते, परंतु सहकार्याने त्या समस्या सोडवू शकता. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. पैशाच्या नियमित व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. उत्पन्न वाढू शकते, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणे टाळावे. अंतर्मनातील प्रश्न आणि विचारांना सामोरे जाण्याची हीच वेळ आहे. मानसिक शांतता राखण्यासाठी योगा आणि ध्यानाचा सराव करा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पाठिंबा द्या.

मीन: धार्मिक कार्यात रस राहील. जोडीदाराच्या शोधात असाल तर हा काळ आनंददायी संबंध आणण्याचा संकेत देत आहे. जोडीदारासोबत आनंद मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून, हा कालावधी करिअरसाठी सकारात्मक परिणाम आणू शकतो. क्षमता ओळखली जाऊ शकते. नोकरीत प्रगती करण्याची चांगली संधी मिळू शकते. धीर धरा आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचला. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असू शकते आणि नियमित व्यायामाचे पालन करणे महत्त्वाचे असू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.