Shravan 2025: 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा' यांसारख्या पावसाळी गीतांनी द्या श्रावण मासाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:43 IST2025-07-24T19:36:49+5:302025-07-24T19:43:13+5:30

Shravan Marathi Wishes 2025: २५ जुलै रोजी श्रावणमास(Shravan 2025) सुरू होत आहे. सबंध महिनाभर शिवउपासना केली जाणार आहे. या काळातच पाऊस मुक्कामी राहणार आहे. या आनंदाच्या सरी अनुभवायला लयबद्ध शब्दांची आणि संगीताची जोड हवीच. चला तर, श्रावण मासानिमित्त आपणही आपल्या प्रियजनांना पाठवूया हे शुभेच्छा संदेश!

प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो, कारण प्रत्येकाचा अनुभवही वेगळा असतो. तरी पावसाळी धुंद, कुंद वातावरणामुळे जनजीवनाचा वेग मंदावतो. क्षणभर का होईना, मनुष्य स्थिरावतो. डोळेभरून निसर्ग सौंदर्य तर कधी रौद्र रूप पाहतो. या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणारी गाणी मनाला मोहून टाकणारी आहेत. श्रावणमासानिमित्त त्याच गाण्यांच्या ओळी शुभेच्छा संदेश म्हणून गुंफूया आणि श्रावणाचे स्वागत करूया.

कवयित्री शांता शेळके यांचं गीत, श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशा ताईंचा सुमधुर आवाज यातून घडलेलं हे गाणं म्हणजे श्रावणाची नांदीच! ऋतूचं कौतुक करताना वापरलेला बरवा म्हणजे सुंदर हा शब्दही किती बरवा आहे ना? शांताबाईंच्या रूपाने हे प्रतिभेचं लेणं मायमराठीला लाभलं हे आपलं भाग्यच!

गजेंद्र अहिरे यांचं गीत, अजय अतुल यांचं संगीत आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं हे सुमधुर गाणं जितकं छान रचलं आहे, तेवढंच सुंदर चित्रीकरण केलं आहे. हिरव्यागार निसर्गात बागडताना अधीर झालेली अभिनेत्री पूजा सावंत शोभून दिसत आहे. या गाण्याने तरुणांच्या प्लेलिस्टमध्ये जागा मिळवली आहे.

जैत रे जैत चित्रपटातली सगळीच गाणी लोकप्रिय आहेत, पण पावसाळ्यात या गाण्याची आठवण होणार नाही, हे शक्यच नाही. ना. धों. महानोर यांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि आशा ताईंचा स्वर यामुळे हे गाणं अजरामर झालं यात वादच नाही. त्यातच स्मिता पाटील यांचा अभिनय म्हणजे दुधात साखर.

सर्जा चित्रपटातलं हे गाणं, ना. धों. महानोर यांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता दीदींचा दैवी स्वर लाभलेलं हे पावसाळी गाणं मनालाही चिंब भिजवून टाकणारं आहे. या गाण्याला प्रणयगीतही म्हणता येईल. मात्र ते आजच्यासारखं बटबटीत, ओंगळवाणं वाटत नाही, तर रानावनात फुलणारं लोभस प्रेम वाटतं.

'बंध प्रेमाचे' या चित्रपटात कवी प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं, अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आता पावसाळी सहलीत हमखास ऐकलं जाणारं लोकप्रिय गीत झालं आहे.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं हे गीत म्हणजे श्रावणाचं सिग्नेचर सॉन्ग म्हटलं पाहिजे. श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता दीदींचा स्वर यामुळे हे गाणं ऐकताना मन सुरांच्या सरीत न्हाऊन निघाल्याशिवाय राहत नाही.

सुधीर मोघे यांचं हे गाणं, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता दीदी-अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं हे गाणं ऐकण्यात बालपण गेलं तरी त्याची मोहिनी आजतागायत कमी झाली नाही आणि होणारही नाही. बरोबर ना? तुमचं आवडतं पावसाळी गाणं कोणतं हे आम्हाला नक्की सांगा.