कुंभ राशीत होणार शनीचं गोचर; 'या' राशीवर सुरू होणार साडेसातीचं पहिलं चरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:13 PM2022-01-26T19:13:41+5:302022-01-26T19:21:58+5:30

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी राशी बदलाला विशेष महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीनं चालणारा ग्रह मानला जातो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी राशी बदलाला विशेष महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीनं चालणारा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यास शनीला सुमारे अडीच वर्षे लागतात.

अडीच वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या गोचरासोबतच काही राशींवर शनीची साडेसाती आणि शनि ढिय्या दिसून येईल.

शनीचे कुंभ राशीत गोचर होताच मीन राशीवर शनीच्या साडेसातीचं पहिलं चरण सुरू होईल. तर दुसरीकडे, २९ एप्रिल २०२२ रोजी शनि राशीच्या बदलामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

मकर राशीच्या लोकांवर तिसरं म्हणजेच साडेसातीचं अंतिम चरण सुरू होईल. तर कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचं दुसरा चरण सुरू होईल. शनि राशीच्या परिवर्तनासोबतच कर्क आणि वृश्चिक राशींवर शनी ढिय्या सुरू होईल.

१२ जुलै २०२२ रोजी शनी वक्री चलनाने पुन्हा मकर राशीत प्रवेश करत असून, १७ जानेवारी २०२३ रोजी मार्गी होऊन पुन्हा कुंभ राशीत येईल. त्यामुळे या कालावधीत मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव असणार नाही.

दुसरीकडे याच कालावधीत धनु राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. आताच्या घडीला शनी मकर राशीत असल्यामुळे मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव सुरू आहे. शनी कुंभ राशीत गेल्यावर या राशीवरील ढिय्या प्रभाव संपुष्टात येईल.

मात्र, जुलै महिन्यात शनी मकर राशीत आल्यावर पुन्हा काही काळासाठी मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव असेल.

या काळात शनीची महादशा असलेल्या लोकांनी कोणतीही जोखीम असलेली कामं टाळावीत. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. चुकीची संगत आणि चुकीच्या कृतींपासून दूर राहा. शनीच्या साडेसातीदरम्यान तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते, त्यामुळे पैसे गुंतवताना विशेष काळजी घ्या.

प्रत्येक शनिवारी शनिदेवाची विधीवत पूजा करा. गरीब किंवा गरजूंना दान करा. कोणत्याही व्यक्तीला दुखवू नका. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की दर शनिवारी पिंपळाच्या झाडावर मोहरीचा दिवा लावल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. शनी स्तोत्राचं पठण करणं देखील फायदेशीर मानलं जातं.