Sarva Pitru Amavasya 2023: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण आहे; जाणीवपूर्वक टाळा 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:16 PM2023-10-13T15:16:18+5:302023-10-13T15:24:13+5:30

Sarva Pitru Amavasya 2023: भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. या दिवशी पितृपक्षानिमित्त पृथ्वीवर आलेले पितर पुनश्च स्वर्गात परत जातात, म्हणून या तिथीला विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. हिंदू धर्मात या तिथीचे विशेष महत्त्व आहे. तसेच ही तिथी शनिवारी आल्यामुळे ती शनी अमावस्या देखील म्हटली जाईल. शिवाय सूर्य ग्रहणही लागणार असल्याने काही चुका जाणीवपूर्वक टाळणे हितावह ठरेल.

१४ ऑक्टोबर, शनिवारी सर्वपित्री अमावस्या असून या दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. ज्यांना आपल्या पितरांची निश्चित तिथी माहीत नसते, ते लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचा श्राद्धविधी करतात. ही तिथी शनिवारी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र याच दिवशी सूर्यग्रहण लागल्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे योग्य ठरेल. त्या पुढीलप्रमाणे :

चुकूनही सर्वपित्री अमावस्येला सकाळी किंवा रात्री श्राद्ध किंवा तर्पण करू नये. पितृ पक्षात श्राद्ध नेहमी दुपारी केले जाते. यावेळी केलेले श्राद्ध आणि दान यांचे फळ अक्षय्य असते. तसेच या दिवशी कोणाशीही गैरवर्तन करू नये, ज्येष्ठांचा अपमान करू नये.

घरात मोठा मुलगा असेल तर धाकट्याने श्राद्ध किंवा तर्पण करू नये. मुलगा नसेल तर पत्नीने श्राद्ध करावे. पत्नी नसेल तर भावाला श्राद्ध करता येते. एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास फक्त ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे. मोठा भाऊ घरात असताना धाकट्यांनी श्राद्ध विधी करणे योग्य ठरणार नाही.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चुकूनही लोखंडी आणि स्टीलची भांडी वापरू नयेत. या दिवशी तुम्ही पितळ्यांची भांडी वापरू शकता किंवा पत्रावळी, द्रोण यांचा वापर करू शकता. पितरांना अर्पण केलेले अन्न देवाला अर्पण करू नये, स्वतंत्र ताट वाढावे आणि नैवेद्य दाखवण्याआधी पदार्थाची चव घेऊ नये.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पूजेमध्ये पांढरे तीळ वापरू नयेत. पितरांची प्रार्थना आणि श्राद्धविधीत नेहमी काळ्या तिळाचा वापर करावा. हे देखील लक्षात ठेवा की पाणी आणि अन्न पितरांना नेहमी अंगठ्याद्वारे दिले जाते.हा तर्पण विधी अंगठा उलट करूनच दिला जातो, सरळ बोटांनी नैवेद्याभोवती पाणी फिरवू नका.

अनावश्यक प्रवास टाळा. सर्वपित्रीच्या दिवशी यात्रा करणे अयोग्य मानले जाते, अशातच सूर्यग्रहण असल्याने मंदिरांमध्ये देवही झाकलेले असतात. त्यामुळे या दिवशी यात्रा करूनही उपयोग नाही, म्हणून प्रवास शक्यतो टाळा.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खोटे बोलणे, पैज लावणे, वाद घालणे, फसवणूक करणे, चोरी करणे इत्यादी अनैतिक कृत्ये करणे टाळावे. असे केल्याने आपण पितरांचा राग ओढवून घेतो आणि त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सर्वपित्री अमावस्येच्या घरात वाद, भांडणं झाली तर पितर रुष्ट होतात आणि न जेवता, न आशीर्वाद देता निघून जातात. या दिवशी, पूर्वज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोप घेतात, म्हणून निदान त्या दिवशी तरी घरात कलह होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या