Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:57 IST2025-06-23T16:44:06+5:302025-06-23T16:57:17+5:30
Samudra Shastra: समुद्रशास्त्रात, शरीराची ठेवण अर्थात विविध अवयवांचे आकारमान पाहून व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव यावर भाकीत केले जाते. इथे आपण नाकाचा आकार पाहून भविष्यात सुख आहे की संघर्ष ते जाणून घेणार आहोत.

चेहऱ्याच्या मधोमध असणारे नाक श्वसनासाठी महत्त्वाचे आहेच, शिवाय ते सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. नाक कापले जाणे, नाकाने कांदे सोलणे, नाक घासणे या म्हणी त्यावरूनच आल्या आहेत. कारण नाक हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या रचनेवरून समुद्र शास्त्राने उलगडलेले भविष्य जाणून घेऊ.
हस्तरेषाशास्त्राप्रमाणेच, समुद्र शास्त्राचेही खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातावरील रेषा वेगवेगळ्या असतात, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या शरीराच्या अवयवांची रचना देखील वेगळी असते. समुद्र शास्त्रात, शरीरावरील या रचना आणि खुणा पाहून व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितले जाते.
समुद्र शास्त्रात नाकाच्या आकाराबद्दल भाकीत सांगितले आहे. लांब, उंच, लहान, चपटे, बसके, फेंदारलेले इत्यादी नाकाचे प्रकार आपले भविष्य कसे वर्तवतात ते पाहू. ज्यावरून येणाऱ्या काळात राजयोग आहे की सांसारिक भोग ते कळेल.
कष्टदायी जीवन :
ज्या लोकांचे नाक लहान असते ते खूप हुशार असतात आणि लाजाळू असतात. ते लोक जीवनात यश आणि संपत्ती मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात. तसेच ते खूप मेहनती असतात. ते त्यांच्या दृढनिश्चयाने आणि कठोर परिश्रमाने आयुष्यात नक्कीच यश मिळवतात. मात्र त्यासाठी खूप कष्ट उपसावे लागतात.
यश, कीर्ती :
असे मानले जाते की ज्या लोकांचे नाक चित्रात काढावे तसे रेखीव असते आणि छिद्रे समान असतात त्यांना अपार लोकप्रियता मिळते. असे लोक जीवनात खूप प्रगती करतात आणि त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. असे लोक अनेक गुणांनी परिपूर्ण असतात आणि प्रत्येक कामात तज्ज्ञ असतात. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यात प्रसिद्धीच्या शिखरावर जातात.
संघर्षमयी जीवन :
ज्या लोकांचे नाक वेडेवाकडे असते त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. तसेच, त्यांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र हे लोक खूप मेहनती असतात.
राजयोग :
असे मानले जाते की ज्या लोकांचे नाक लांब असते ते खूप भाग्यवान असतात. ते ऐषोरामी जीवन जगतात आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता नसते. अशा व्यक्ती त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतात. लांब नाक असणे हे दर्शवते की त्यांचा स्वभावही थोडा आनंदी असतो आणि त्यांना आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतात.
श्रीमंती :
ज्या लोकांचे नाक टोकदार असते, त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे जीवन संपत्तीने भरलेले असते. हे लोक जे काही मिळवू इच्छितात ते ते अगदी सहजपणे साध्य करतात. आयुष्यात थोडेसे प्रयत्न केले तरी त्यांना पैसे मिळतात.
समंजस :
असे मानले जाते की ज्या लोकांचे नाक पोपटासारखे असते ते खूप बुद्धिमान असतात आणि त्यांचे भविष्य देखील खूप उज्ज्वल असते. अशा नाकाचे लोक त्यांच्या प्रियजनांच्या आनंदाची पूर्ण काळजी घेतात आणि नात्यांमध्ये गोडवा आणि सुसंवाद राखण्यास तत्पर असतात. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तर ते ती अगदी सहजपणे हाताळतात आणि सर्वात कठीण परिस्थितीतून बाहेर पडतात.