Rituals: उभ्या उभ्या केलेली पूजा शास्त्रमान्य आहे का? वाचा पूजेचे योग्य नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:16 PM2024-04-12T17:16:35+5:302024-04-12T17:18:52+5:30

Rituals: सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकतो. वास्तविक पाहता हे नेमके उलट केले पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' अशी आपली स्थिती असते. माउलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती. मात्र त्यांचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे, की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांत चित्ताने उभे राहिलो तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही. आलाच तरी चित्त स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्याने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत तरी असेल का? याचा शास्त्राला धरून घेतलेला धांडोळा.

सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे. जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकवलेले, गॅस, टेबल, स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते. पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊ.

आजही अनेक लोक उभे राहून देवी-देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये. देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठण करत पूजा करावी.

घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लट्कवणे योग्य नाही. देवघर जमिनीवरच असले पाहिजे. पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते. जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवू नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे.

उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत. जसे की, देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती, वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो, मनात शंका कुशंका येतात. देवाची आरती करताना हातात ताम्हन असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते, कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसून करावी.

देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे, शांत व्हावे, प्रसन्न राहावे यासाठी असते. त्याक्षणी देवाशी संवाद घडावा, हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरु असतात, त्यावर बंध म्हणून स्तोत्रपठण करायचे असते. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणांशी लिन होते. म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य!