शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:38 IST

1 / 8
मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी त्याला सामोरे जायचेच आहे. हे माहीत असूनही कोणाचीही निधन वार्ता ऐकताच आपल्या काळजाचा ठोका चुकतो आणि अनपेक्षितपणे एखाद्या अंत्ययात्रेचे दर्शन झाले की मन अस्वस्थ होते. हेच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना झाले तर शुभ मानावे की अशुभ याबाबत शास्त्रात माहिती दिली आहे ती पाहू.
2 / 8
शकुन शास्त्रात आपल्याला शुभ अशुभ संकेताची माहिती मिळते. ज्यावरून आपल्याला कळू शकते की नजीकच्या काळात आपल्याबाबत काय घडणार आहे. परिचित-अपरिचित व्यक्तीची अंत्ययात्रा दिसणे हा शुभ शकुन आहे असे शास्त्रात म्हटले आहे.
3 / 8
शास्त्रानुसार अंत्ययात्रा दिसणे हे शुभ लक्षण आहे. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला अंत्ययात्रा दिसली तर कामात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. शिवाय, त्यामुळे नजीकच्या काळात एखादा लाभ होण्याचेही ते संकेत असतात असे म्हटले जाते. मात्र एखाद्याचे देवाघरी जाणे, आपल्या दृष्टीने शुभ कसे मानावे?
4 / 8
प्रत्येक जीव भूतलावर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सातत्याने लढा देत असतो. कधी परिस्थितीशी, कधी लोकांशी, कधी नशिबाशी! हा त्याचा प्रवास थांबतो तो मृत्यूनंतरच! म्हणून गेलेली व्यक्ती देवाघरी निघाली असे आपण म्हणतो. अर्थात भूलोकातून तिची सुटका झाली, ही त्यामागील शुभ घटना मानली जाते. म्हणून गेलेल्या व्यक्तीला सद्गती लाभावी अशी आपण मनोमन प्रार्थना करतो.
5 / 8
महत्त्वाचे काम असो किंवा अन्य कधीही बाहेर जाताना तुम्हाला वाटेत अंत्ययात्रा दिसली, तर दोन क्षण थांबून मृत व्यक्तीला दुरूनच नमस्कार करा. गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करा. गेलेली व्यक्ती देखील देवरूप होते असे समजून आपण तिला नमस्कार करतो. तिचे आशीर्वाद लाभून तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील.
6 / 8
असे म्हणतात, की स्मशानवासी देवाधिदेव महादेव पार्वतीशी विवाहाच्या वेळी शुभ मुहूर्ताची वाट पाहताना स्मशानात थांबून होते. ब्रह्मदेवांनी त्यांना शुभ मुहूर्त कळवला. तरी महादेव निघाले नाही, वरात थांबून राहिली. मग ती कधी निघाली?
7 / 8
तर, ज्यावेळी स्मशानात अंत्ययात्रा आली, अंत्यविधी झाले, त्यानंतर महादेवाने तो मृत जीव शिवाशी एकरूप झाल्यावर त्याची राख सर्वांगाला लावली आणि मग वरात घेऊन शुभकार्याला अर्थात लग्नाला निघाले.
8 / 8
महादेव विवाहासारख्या प्रसंगाला अंत्ययात्रा पाहून निघतात, तर तुम्ही आम्ही महत्त्वाच्या कामाला निघताना अंत्ययात्रा दिसल्यामुळे बावरून जाण्याचे कारण नाही हे लक्षात घ्या. नमस्कार करा आणि पुढच्या कामाला निघा, हीच शास्त्राची शिकवण आहे.