पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:20 IST2025-09-09T15:39:53+5:302025-09-09T16:20:13+5:30
Pitru Paksha 2025: ८ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरु झाला असून २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येने त्याची सांगता होणार आहे. या काळात पितरांच्या श्राद्ध तिथीनुसार श्राद्ध विधी करून पितरांना नैवेद्य ठेवला जातो. मात्र कावळ्याने त्या अन्नाला स्पर्श न केल्यास मनाला रुखरुख लागते.

पितृपक्षात पितृनाचा मान दिला जातो, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून श्राद्धविधी करून नैवेद्य दाखवला जातो. मात्र कावळा न शिवल्यास आपल्याकडून काही राहून गेले का? ही भावना मनाला सलत राहते. त्यामागे कारण काय असू शकते, याचा गरुड पुराणात दिलेला खुलासा पहा आणि पुढील चुका टाळा.
पितृ पक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते. त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्धविधी केल्यानेच पितरांचा आत्मा तृप्त होतो असे नाही, तर व्यक्ति हयात असतानादेखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ति संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते. म्हणून श्राद्धविधी बरोबरच दिलेल्या गोष्टींचे पालन करा, तरच पिंडाला तसेच नैवेद्याला कावळा लगेच शिवेल.
भांडणं टाळा : पितर अर्थात आपले पूर्वज हे पितृपक्षाच्या काळात पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, त्यांचा संसार सुखासुखी सुरु आहे की नाही हे पाहतात, मात्र त्यांच्या पश्चात घरात वाद, एकमेकांचा अपमान, मारझोड, शिवीगाळ अशा गोष्टी घडत असतील तर त्यांचा आत्मा दुखावला जाईल आणि पिंडाला/ नैवेद्याला कावळा शिवणार नाही.
वचनाची अपूर्णता : जर तुम्ही आपल्या पितरांच्या मृत्यूच्या वेळी काही वचन दिले असेल आणि ते पूर्ण केले नसेल किंवा त्यादृष्टीने काही प्रयत्नही केले नसतील तर पितर तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि ती नाराजी अन्नाला स्पर्श टाळण्यातून व्यक्त करू शकतात.
एकोपा : पितरांना आपल्या पश्च्यात आपल्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये, भावंडांमध्ये एकोपा पाहून संतुष्टी मिळते. मात्र अनेक घरात आई वडिलांच्या निधनानंतर घार तुटतात, विभक्त होतात, एकमेकांची तोंडं बघेनाशी होतात. अशा ठिकाणी देखील कावळा अन्नाला स्पर्श करत नाही असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे.
भावना : नैवेद्य तयार करताना आणि नैवेद्य ठेवताना पितरांचे स्मरण आवश्यक असते. त्याबरोबरच समर्पणाचा भाव शुद्ध असेल तरच कावळा अन्नाला शिवतो. अन्यथा ते अन्न शिजवताना वा नैवेद्य ठेवताना मनात राग, द्वेष, आकस, सुडाची भावना असेल तर त्या नैवेद्याला कावळा अजिबात शिवत नाही.
वासना : पितरांचा नैवेद्य असला तरी त्यात एवढे पदार्थ केले जातात की त्या अन्नावर वासना जडते, भूक चाळवते, आधाशीपणे ते अन्न आपण कधी खाणार याची आस लागते. अशा वासना जडलेल्या अन्नाला कावळा स्पर्श करत नाही. म्हणून देवाला नैवेद्य दाखवताना आपण जसे नाक बंद करतो, डोळे झाकतो, त्याप्रमाणे पितरांना नैवेद्य दाखवताना नाक आणि डोळे झाकावेत, तरच कावळा अन्नाला स्पर्श करेल.