Pitru paksha 2021 : वेळेअभावी श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग या दहा उपायांपैकी एकाचा अवलंब करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:37 PM2021-09-28T12:37:08+5:302021-09-28T12:48:10+5:30

Pitru Paksha 2021 : आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मरण रोजच केले पाहिजे, परंतु रोज शक्य नसेल तर निदान पितृपक्षात त्यांच्या प्रति ऋणनिर्देश म्हणून पितृश्राद्ध करायचे असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे पुरेसा वेळ नाही, असलाच तर मार्गदर्शन करणारे कोणी नाही, दोन्ही असले तरी हे करण्याची कोणाला गरज वाटत नाही तर कोणाला आवड वाटत नाही. यासर्वातुन तुम्हाला आवड, निवड आणि पुरेशी सवड असेल तर पितृपक्षात पुढीलपैकी कोणत्याही एका उपायांचा अवलंब करता येईल. ते उपाय जाणून घेऊ.

१. पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्या जेवणाआधी एक नैवेद्याचे ताट कावळ्याला, गायीला नाहीतर कुत्र्याला ठेवावे.

२. पितरांची तिथी माहीत नसेल, तर सर्वपित्री अमावस्येला नैवेद्याचे ताट वाढून काकबली अर्थात कावळ्याला नैवेद्य ठेवावा.

३. पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला महत्त्व असते. परंतु ऐन वेळेस ब्राह्मण उपलब्ध नसले तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. समोरची व्यक्ती जेवून तृप्त झाली पाहिजे, हा त्यामागील हेतू आहे.

४. श्राध्दपक्षात दानाला अतिशय महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, उपयुक्त वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे.

५. श्राद्धाचा स्वयंपाक करण्याइतका वेळ नाही? मग शिधा दान करा. शिधा अर्थात कोरडे धान्य त्यालाच कदान्न असे म्हणतात. तसे दिल्यानेही एखाद्याच्या जेवणाची सोय होऊ शकते.

६. श्राध्दपक्षात दक्षिणेकडे रोज एक दिवा लावावा, त्यामुळे पितरांचा आत्मा मुक्त होण्यास गती मिळते.

७. पितृपक्षात रोज एकदा तरी पितृ स्तोत्र नाहीतर पितृ सूक्ताचे पठण केले पाहिजे.

८. मूक प्राण्यांची हिंसा न करता त्यांना जेवू घातले पाहिजे. यात माशांना खाऊ घालणे, कुत्र्याला भाकरी घालणे, गायीला चारा घालणे अशा गोष्टींचा समावेश करता येईल.

९. पितरांचे स्मरण करून नैवेद्य दाखवतात सहकुटुंब प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात आणि कुटुंबाची, कुळाची भरभराट होते.

१०. दिवसातून एकदा तरी रोज ॐ पितृदेवताभ्यो नम' या मंत्राचा १०८ वेळा जप केला पाहिजे.