Mauni Amavasya 2025: महाकुंभच्या पार्श्वभूमीवर मौनी अमावस्या ठरणार खास; न विसरता करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:19 IST2025-01-24T12:16:22+5:302025-01-24T12:19:47+5:30

Mauni Amavasya 2025: १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु झाला आहे आणि येत्या २९ जानेवारी रोजी पौष अमावस्येला तिसरे शाही स्नान असणार आहे. ही तिथी मौनी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. ज्योतीष शास्त्रात या तिथीचे खास महत्त्व आहे. आपल्याला महाकुंभात सामील होऊन पुण्यप्राप्ती करता आली नाही? हरकत नाही, तोच पुण्यसंचय घरी राहून करता यावा म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले खास उपाय त्या दिवशी न विसरता करा.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोप पूजनीय मानले जाते. देवघरातल्या देवांची जशी रोज पूजा करतो, तशी रोज सकाळी तुळशीचीही पूजा केली जाते आणि सायंकाळी आठवणीने तुळशीपाशी दिवाही लावला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येला तुळशीची विशेष पूजा करावी. त्यातही तो दिवस पौष अमावस्येचा असेल तर दुग्धशर्करा योग समजावा. कारण पौष मास हा धार्मिक कार्यसाठीच समर्पित मानला जातो. या काळात शक्य तेवढे दान धर्म केल्याने पुण्य लाभते. पौष अमावस्यां हा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी करण्याचे उपाय जाणून घेऊ.

मौनी अमावस्येला (Mauni Amavasya 2025) पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिसळून तुळशीला अर्पण करा आणि सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तसेच उम्बरठ्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावले काढून हळद कुंकू वाहा. अमावस्या ही लक्ष्मीची आवडती तिथी असल्याने त्यादिवशी अशा रीतीने केलेली पूजा पाहून ती संतुष्ट होते आणि कृपावंत होते, ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

अमावस्या ही तिथी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्धविधी करण्याची तिथी मानली जाते. या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या पारावर तेलाचा दिवा लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्याने कुंडलीतील दोष नष्ट होतात आणि त्या दिवशी लावलेल्या दिव्याच्या ज्योतिमुळे पितरांना सद्गती मिळते व पितृदोष दूर होतात.

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः। नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।। तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

विशेषतः मौनी अमावस्येला लक्ष्मी पूजा करावी. घरात लक्ष्मीची तसबीर नसेल तर देवघरातील अन्नपूर्णेसमोर तुपाचे निरांजन लावावे. हळद कुंकू वाहावे. श्रीसूक्त पठण करावे. दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि एखाद्या गरजवंतास अन्न किंवा वस्त्रदान करावे. असे केल्याने भविष्यात मूलभूत गरजांची उणीव भासणार नाही.