Maha Kumbh 2025: नागा साधू होणे सोपे नाही; द्यावी लागते खडतर परीक्षा, करावे लागते जिवंतपणी पिंडदान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:46 IST2025-01-17T16:43:37+5:302025-01-17T16:46:35+5:30
Maha Kumbh 2025: प्रयागराज येथे नुकत्याच सुरु झालेल्या महाकुंभमेळ्याच्या (Maha Kumbh 2025) वेळी हजारोंच्या संख्येने दिसणारे नागा साधू एरव्ही कोणाच्याही नजरेस पडत नाहीत, कारण ते त्यांच्या नियमात बसत नाही. नागा साधू बनणे आणि व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही. तसे बनण्याआधी त्यांना कठोर प्रक्रियेतून जावे लागते. जाणून घेऊया त्याविषयी!

नागा साधू या शब्दावरूनच अर्थ स्पष्ट होतो, नागा अर्थात नग्न राहणारे साधू! हे लोक तिन्ही ऋतूंमध्ये आयुष्यभर निर्वस्त्र राहतात. आपण त्यांच्याकडे भौतिक जगाच्या नजरेतून पाहत असल्यामुळे त्यांचे नग्न राहणे आपल्या नजरेला खटकत असले तरी, ते लोक शरीर धर्माच्या पलीकडे गेलेले असतात. निर्वस्त्र राहणे हे सर्व संग परित्यागाचे लक्षण आहे. पण हे साधू तसे का करतात? त्यासाठी त्यांना कोणत्या परीक्षांना सामोरे जावे लागते, ते जाणून घेऊ.
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चहा, साखर सोडू शकत नाही, अशात घर, संसार सोडणे जवळपास अशक्य! मात्र वैराग्य स्वीकारलेले हे लोक सर्व संग परित्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात. समाजाला आपल्या निर्वस्त्र असण्याचा त्रास होउ नये म्हणून ते हिमालयासारख्या ठिकाणी किंवा घनदाट जंगलात गुप्तपणे राहतात.
नागा साधू केवळ कुंभमेळ्यात सहभागी होतात आणि तिथेही घोळक्याने राहतात आणि समाजाच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने वावरतात. नागा साधू कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. ते अलिप्त राहतात. ते स्वतःला देवाचे दूत मानतात.
१) नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेला सुमारे १२ वर्षे लागतात, ज्यामध्ये ६ वर्षांत ते नागा पंथात सामील होण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करतात. यादरम्यान ते फक्त लंगोट नेसतात. कुंभमेळ्यात नागा साधूंचा कळप जमतो आणि येथे नवस केल्यानंतर ते या लंगोटाचाही त्याग केला जातो.
२) नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. यामध्ये नागा साधूंना प्रथम ब्रह्मचर्य शिकवले जाते. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांना महापुरुषाची दीक्षा दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे पिंडदान करतात, ज्याला बिजवान म्हणतात.
3) नागा साधू झोपण्यासाठी कोणताही पलंग किंवा अंथरूण वापरत नाहीत, तर ते जमिनीवर झोपतात. नागा साधू दिवसातून एकदाच खातात. नागा साधू एका दिवसात फक्त ७ घरातून भिक्षा मागू शकतात. भिक्षा न मिळाल्यास उपाशीपोटी दिवस काढावे लागतात.
४ ) नागा साधू बनण्याची दीक्षा फक्त शैव आखाड्यात दिली जाते. नागा साधू भस्म विलेपन करतात यावरून लक्षात येते की ते शैव पंथी असतात. शिव शंभो जसे स्मशान वासी आहेत त्याप्रमाणे नागा साधू देखील विभूती लेपन करून एकांतवासात राहतात.
यावरून लक्षात येते की नागा साधू होणे सोपे नाही. दुर्दैवाने त्यांची प्रतिमा माध्यमांनी एवढी दूषित केली आहे की लोकांना ते चरस, गांजा ओढणारे रोगट लोक वाटतात. तसे असतातही, मात्र जे खरे खुरे व्रतस्थ जीवन जगतात ते प्रसिद्धी पासून कोसो दूर राहून भगवंतभक्तीमध्ये गढून गेलेले असतात!