शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:37 PM2024-03-15T12:37:48+5:302024-03-15T12:43:19+5:30

समस्यातून दिलासा मिळण्यासाठी किंवा ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी एखादे रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहु-केतु या तीन ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या ग्रहांचा प्रभाव एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकू शकतो, अशी मान्यता आहे. शनीची साडेसाती, दशा, महादशा आणि अंतर्दशा तसेच राहु-केतुचीही दशा, महादशा आणि अंतर्दशा याचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते.

एखाद्या संकट काळात, कितीही प्रयत्न केले आणि कामे होत नसतील, तर कुंडलीचा अभ्यास करून एखादे रत्न धारण करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र, कोणतेही रत्न योग्य ज्योतिषीय सल्ल्याने आणि विधीनुसार धारण करावे, असे आवर्जून सांगितले जाते. शनी आणि राहु-केतु या तीनही ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी करणारे एक रत्न आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी रत्नांचे वर्णन केले आहे. कारण काही रत्न ग्रहाशी संबंधित असतात. शनी आणि राहु-केतुशी संबंधित या रत्नाचे नाव लाजवर्त असे आहे. हे धारण केल्याने कुंडलीतील राहु-केतू आणि शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

लाजवर्त हे रत्न निळ्या रंगाचे असते. याशिवाय त्यावर सोनेरी रंगाचे पट्टेही आहेत. हे रत्न बाजारात सहज उपलब्ध होऊ शकते. हे रत्न अफगाणिस्तान, अमेरिका आणि रशियामध्ये आढळते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनी उच्च राशीमध्ये स्थित आहे, त्या व्यक्ती हे रत्न धारण करू शकता. मकर आणि कुंभ राशीचे लोक हे रत्न धारण करू शकतात.

राहु-केतु जर कुंडलीत शुभ असतील तर हे रत्न धारण करू शकता. कुंडलीत शनी आणि राहु उच्च स्थितीत किंवा शुभ स्थानी नसतील, तर हे रत्न धारण करू नये, असे सांगितले जाते. तसेच कुंडलीत मंगळाचे स्थान प्रतिकूल असेल, तरीही हे रत्न धारण करू नये, असे म्हटले जाते.

लाजवर्त धारण केल्याने व्यक्तिमत्व सुधारते. यासोबतच मानसिक क्षमताही विकसित होते. जर एखाद्या मुलाला वाईट नजर लागत असेल, तर हे रत्न धारण करता येऊ शकते. हे रत्न धारण केल्याने काम आणि व्यवसायात यश मिळते. हे रत्न कुंडलीत पितृदोष असला तरी धारण करता येऊ शकते, असे सांगतात.

लाजवर्त हे रत्न किती कॅरेटचे धारण करावे, याबाबत योग्य ज्योतिषीय सल्ला अवश्य घ्यावा. त्यानुसार हे रत्न बाजारातून खरेदी केल्यानंतर शनिवारी तिन्ही सांजेला धारण करू शकता. चांदीच्या अंगठीत किंवा लॉकेटमध्ये घालावे, असे म्हटले जाते. तसेच ब्रेसलेटमध्ये रत्न घालून ते परिधान केले, तरी चालू शकते, असे म्हटले जाते.

लाजवर्त हे रत्न मधल्या अंगुलीत धारण करावे, असे म्हणतात. हे रत्न धारण केल्याने शक्ती, बुद्धिमत्ता आणि कीर्ती वाढते, असे सांगितले जाते. मंगळवारी हे रत्न धारण केल्यासही अनेक समस्यांतून दिलासा मिळू शकतो, अशी मान्यता आहे.

सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.