By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:41 IST
1 / 6काशी विश्वनाथ मंदिर हे असे ठिकाण आहे हरी आणि हर अर्थात विष्णू आणि शंकर एकत्र राहतात. तीर्थक्षेत्र म्हणून दरवर्षी लाखो भाविक तिथे दर्शनाला जातात. सध्या श्रावण मास शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे तिथे भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. अशातच भाविकांना दर्शन घडले लक्ष्मी मातेच्या वाहनाचे, अर्थात पांढऱ्या घुबडाचे!2 / 6गेल्या तीन दिवसांपासून तिथे देवी लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर बसलेले दिसले आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये, पांढरे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन असल्याचे सांगितले आहे. २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेजारतीनंतर मंदिराच्या शिखरावर ते पहिल्यांदा दिसले. श्रावण मासात त्याचे दिसणे आणि शिखरावर जाऊन बसणे लोकांना चमत्कारिक वाटले. याबद्दल ज्योतिषांनी लावलेले संदर्भ जाणून घेऊ. 3 / 6ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही ही घटना खूप शुभ मानली जात आहे. कारण, शास्त्रांमध्ये, देवी लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड हे शांती, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे. भारताच्या अति महत्त्वाच्या मंदिरावर पांढऱ्या घुबडाचे बसणे हे पूर्ण देशासाठी भाग्याचे लक्षण मानले जात आहे. 4 / 6ज्योतिष तज्ज्ञ सांगतात, पांढरे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहे. पांढरे घुबड कुठेही सहज दिसत नाहीत. अशा परिस्थितीत काशीमध्ये पांढऱ्या घुबडाचे आगमन हे देखील लक्ष्मी देवीचे आगमन झाल्याचे लक्षण आहे. सरकार लवकरच धार्मिक क्षेत्रात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशाला आर्थिक सुबत्ता मिळण्याचीदेखील शक्यता आहे. म्हणजेच येत्या काळात सरकार मोठा आर्थिक निर्णय घेऊ शकते. सध्या जीएसटी दुरुस्तीबाबतही चर्चा सुरू आहे, अशा परिस्थितीत ही घटना घडणे आणखी शुभ आहे, जे देशाच्या प्रगतीसाठी कारक ठरू शकते. 5 / 6ज्योतिषी असेही म्हणत आहेत की येत्या काळात ग्रहांची स्थिती देखील सकारात्मक लाभ देणार असल्याने, येत्या काही महिन्यांत अमेरिका देखील शुल्काबाबतचा आपला निर्णय बदलू शकते, ज्यामुळे भारताला फायदा होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काशीचे खासदार आहेत, त्यामुळे काशीबाबत ते मोठा निर्णय घेऊ शकतील. 6 / 6पंचांगानुसार, २० ऑगस्ट रोजी बुध प्रदोष योग होता, जो भगवान शिवाला समर्पित आहे आणि बुध प्रदोष संपत्ती, कीर्ती, यश देणारा आहे. अशा परिस्थितीत, पांढऱ्या घुबडावर स्वार होऊन माता लक्ष्मी शिवाच्या निवासस्थानी येणे खूप शुभ आणि सौभाग्य दर्शवते.