२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:59 IST2025-04-17T14:43:44+5:302025-04-17T14:59:51+5:30

Jupiter Transit Gemini May 2025: गुरु ग्रह एका वर्षांत तीन राशीत अतिचारी गतीने गोचर करणार आहे. गुरुचे हे संक्रमण कोणत्या राशींसाठी कसे असू शकेल? जाणून घ्या... (Guru Gochar 2025 Atichari Gati)

२०२५ हे अनेकार्थाने विशेष ठरत आहे. २९ मार्च २०२५ रोजी नवग्रहातील सर्वांत मंदगतीने गोचर करणाऱ्या शनि ग्रहाने स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. आता जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असणार आहे. तर यानंतर आता मे महिन्यात नवग्रहांमधील सर्वांत महत्त्वाचे राशीपरिवर्तन होणार आहे. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

गुरु ग्रह एखाद्या राशीत सुमारे एक वर्ष विराजमान असतो. परंतु, अनेक वर्षांनंतर गुरु ग्रहाची अतिचारी गती पाहायला मिळणार आहे. गुरु ग्रहाच्या गोचरावेळी सूर्य जवळून भ्रमण करणार आहे. त्यामुळे गुरु अतिचारी पद्धतीने गोचर करणार आहे. पुढील ८ वर्षे गुरु ग्रह त्याच स्थितीत राहील, कारण जेव्हा गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा सूर्य त्याच्या जवळ असेल, ज्यामुळे येत्या ८ वर्षांत गुरु अतिचारी गतीने गोचर करेल, असे सांगितले जात आहे. एखादा शुभ ग्रह अतिचारी गतीने गोचर करतो, ही बाब शुभ मानली जात नाही, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, १४ मे २०२५ रोजी रात्री ११.२० वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करेल आणि वर्षाच्या शेवटी म्हणजेच ५ डिसेंबर २०२५ रोजी गुरु वक्री होऊन पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, असे सांगितले जात आहे. गुरुची अतिचारी गती केवळ राशींवर नाही, तर देश दुनियेवर प्रभावकारी मानली जात आहे. या दरम्यान काही अप्रिय घटना घडू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. या गुरुच्या अतिचारी गतीचा मेष ते मीन कोणत्या राशींवर लगतच्या काळात कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: कल अध्यात्माकडे खूप असेल. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. ध्यात्माकडे कल असल्याने अनेक धार्मिक यात्रा करू शकता. परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

वृषभ: सुख, समृद्धी, संपत्ती आणि वैभव प्राप्त करू शकतात. भाऊ-बहिणींशी संबंध चांगले होऊ शकतात. आनंददायी घटना घडू शकतील. परंतु, आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.

मिथुन: काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांशी संबंधित दीर्घकाळापासूनच्या समस्या सुटू शकतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे यश मिळवू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळापासूनच्या समस्या आता सोडवता येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. समाजात आदर वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.

कर्क: वाढत्या जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात खूप दबाव जाणवू शकतो. योजना खूप काळजीपूर्वक बनवाव्या लागतील. आर्थिक बाबी काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील. अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थापन करून पुढे जावे लागेल. कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळायला लागेल. अन्यथा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सिंह: बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुप्त संपत्ती, मालमत्ता किंवा काही वारसा मिळण्याची शक्यता आहे, यानंतर आर्थिक स्थिती बरीच मजबूत होऊ शकेल. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतील.

कन्या: नात्यांचे महत्त्व कळेल. कामावर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करू शकाल. नोकरीत फायदेशीर बदल दिसतील. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ अधिक पैसे कमविण्याचा काळ ठरेल. या काळात चांगला नफा मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

तूळ: भाग्योदय होऊ शकतो. समाजात आदर वाढेल. मान-सन्मान प्राप्त होऊ शकतील. आर्थिक परिस्थितीतील दीर्घकाळापासून असलेल्या समस्याही संपू शकतील. कल अध्यात्माकडेही अधिक असेल. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना गुरु गोचर फायदेशीर ठरू शकते. पगारवाढीसोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे. मुलांकडून सुख मिळेल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या माध्यमातून फायदा कमावू शकता.

वृश्चिक: करिअरशी संबंधित संधींचा चांगला वापर करू शकाल. ही संधी गमावली तर करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो. वडिलांशी बोलताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. धोरणात्मक नियोजन महत्त्वाचे असेल. आर्थिक स्थिती मध्यम राहणार आहे. या काळात अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरुचे मिथुन राशीत होणारे गोचर शुभ ठरू शकते. भागीदारीच्या कामात फायदा मिळू शकेल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. नातेसंबंधांमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायिक असाल तर नवीन करारांचा फायदा होऊ शकेल. विवाहित लोकांचे संबंध सुधारतील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मकर: अनपेक्षित उत्पन्न मिळू शकते. एखाद्या मोठ्या कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर फायदा होईल. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी हा काळ खास नाही, त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप विचारपूर्वक पुढे जावे लागेल. वाढत्या खर्चाचा आणि संभाव्य नुकसानाचा अनुभव येऊ शकतो. व्यापाऱ्यांना खूप पैसे कर्ज घ्यावे लागू शकतात.

कुंभ: जीवनात आनंददायी घटना घडू शकतात. करिअरच्या बाबतीत फायदे मिळू शकतात. करत असलेल्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ट्रेडिंग आणि शेअर मार्केटद्वारे नफा कमवू शकता. पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल.

मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरुचे मिथुन राशीत होणारे गोचर लाभदायक ठरू शकेल. भौतिक सुखे मिळू शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी हा चांगला काळ असेल. काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल. समाजात आदर आणि सन्मान वाढेल. आईशी असलेले संबंध अधिक दृढ होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.