३० दिवस गुरु स्वराशीत अस्त: २ राशींना शुभ-लाभ, १० राशींना संमिश्र; ‘हे’ उपाय तारणहार ठरतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:08 AM2023-03-29T07:08:06+5:302023-03-29T07:08:06+5:30

गुरुचे अस्तंगत होणे अतिशय महत्त्वाचे मानले जात असून, या काळात शक्यतो शुभकार्ये केली जात नाहीत. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? कोणते उपाय उपयुक्त ठरतील?

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशीत अस्तंगत होणार आहे. ३१ मार्च रोजी गुरु अस्तंग होणार असून, ३० एप्रिल रोजी गुरुचा उदय होणार आहे. म्हणजेच सुमारे महिनाभर गुरु अस्तंगत असणार आहे. विशेष म्हणजे अस्तंगत स्थितीत असताना गुरु मीन राशीतून २१ एप्रिल रोजी मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आताच्या घडीला राहु विराजमान आहे. (jupiter combust in pisces march 2023)

गुरुचा मेष राशीत प्रवेश झाला की, गुरु राहुचा चांडाळ योग जुळून येत आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. आताच्या घडीला सूर्य आणि गुरु मीन राशीत आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या मध्यावर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि काहीच दिवसांनी गुरुही मेष राशीत जाईल. (guru asta in meen rashi 2023)

तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. ३० एप्रिलनंतर गुरु आणि सूर्य एकमेकांपासून लांबच्या अंशावर जातील. गुरु अस्तंगत असताना शुभ कार्ये केली जात नाहीत. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. विशेष करून समस्या, अडचणी वाढू शकतील. गुरु अस्ताचा तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. मन धार्मिक कार्यात रमेल. तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखला जाईल. अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. जे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, ते काही अडथळ्यांनंतर पूर्ण होऊ शकेल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी प्राप्त होऊ शकेल. माता-पिता तसेच गुरु सेवा करावी. नियमितपणे दुर्गा देवीचे पूजन करावे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकते. घरगुती खर्च वाढू शकतात. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आई-वडिलांशी नाते मजबूत होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. येणी परत मिळण्यास काहीसा विलंब होऊ शकतो. यथाशक्ती दानधर्म करावा. गुरु मंत्राचा जप करावा.

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे समस्याकारक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात काही समस्या जाणवतील. पण संवादातून परिस्थिती सामान्य होऊ शकेल. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामात स्पष्टता ठेवा. सामाजिक कार्य केल्याने आदर वाढेल. सामाजिक वर्तुळही वाढेल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. मेहनत करत राहिल्यास यश मिळू शकेल. श्रीविष्णूंचे पूजन करावे. विष्णु सहस्रनामाचे पठण करावे.

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. कठोर बोलणे टाळा. वर्तनावर नियंत्रण ठेवा. वडिलधारी व्यक्तीकडून चांगले लाभ मिळू शकतील. मित्रांमुळे अनेक समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. परंतु तरीही कठोर परिश्रम करावे लागतील. व्यावसायिक जीवनात थोडे सावधगिरीने काम करावे लागेल. गुरुवारचे व्रत ठेवावे. सत्यनारायण कथेचे श्रवण करावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे यशकारक ठरू शकेल. अचानक आलेल्या अडचणी कमी होऊ शकतील. व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकेल. मुलांचे आरोग्य चांगले राहू शकेल. शैक्षणिक क्षेत्रातील यश पाहून मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होऊ शकतील. भावंडांसोबत कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जोडीदारासोबत काही वाद संपुष्टात येऊ शकतील. नाते घट्ट होऊ शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुंडलीत गुरु मजबूत करण्याचे उपाय करावेत.

कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे प्रगतीकारक ठरू शकेल. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतील. चांगली बातमी मिळू शकते. एखादा वाद संपुष्टात येऊ शकेल. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. गुंतवणूक करत असाल तर चांगला फायदा होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्यावी. 'ॐ बृं बृहस्पतये नम:' मंत्राचा जप करावा.

तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकते. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. व्यवसायात चांगली प्रगती झाल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकेल. मुलांच्या करिअरमध्ये प्रगती पाहून मन प्रसन्न राहू शकेल. अतिआत्मविश्वास टाळावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. यथाशक्ती गरजूंना दान द्यावे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिक्षकांकडून सहकार्य मिळू शकेल. सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवणे हिताचे ठरू शकेल. प्रेम जीवनात भावना व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते. कौटुंबिक सदस्यासोबत तुमचे संबंध अस्थिर राहतील, परंतु हळूहळू परिस्थिती सामान्य होईल. ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुष्कराज रत्न धारण करणे हिताचे ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. गुंतवणुकीचा विचार पुढे ढकलणे हिताचे ठरू शकेल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांनी आपल्या कामात लक्ष द्यावे. आई किंवा वडिलांशी वाद होऊ शकतो. गरजूंना दान द्यावे.

मकर राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकेल. जोडीदारासोबत कोणत्याही गैरसमजामुळे वाद होऊ शकतो. नात्यात काही अंतर येऊ शकते. या काळात थोडे जपून काम करावे लागेल. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्याने पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा.

कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकते. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकेल. गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जात आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामामुळे धावपळ करावी लागू शकते. वाणीवर नियंत्रण ठेवावे. प्रिय व्यक्तीच्या मदतीने थोडा दिलासा मिळेल. दर गुरुवारी ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः! हा मंत्र १०८ वेळा म्हणणे हिताचे ठरू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना गुरुचे अस्तंगत होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी चांगले काम होऊ शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. गुंतवणूक करणे टाळावे. मित्राला गुप्त गोष्टी सांगणे टाळावे. अन्यथा अडचणीत येऊ शकाल. महादेव शंकरांची उपासना करावी. शिव सहस्रनामाचे पठण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.