Jupiter And Mercury Direct 2021: गुरु-बुध एकाच दिवशी मार्गी; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नेमका काय लाभ, फायदा होईल? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:13 AM2021-10-16T09:13:32+5:302021-10-16T09:17:56+5:30

guru in makar and budh in kanya direct 2021: बुध आणि गुरुचे या दोन्ही ग्रहांचे होत असलेले मार्गी चलन काही राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रात निर्धारित कालावधीत नवग्रहातील ठराविक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. सोमवार, १८ ऑक्टोबर रोजी नवग्रहातील दोन महत्त्वाचे ग्रह मार्गी चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करणार आहेत.

पहिला ग्रह म्हणजे गुरु. मकर राशीत वक्री चलनाने विराजमान झालेला गुरु ग्रह आता याच राशीत मार्गी होणार आहे. गुरु ग्रहाला वैभव, समृद्धी, ज्ञान आणि विवेक यांचा कारक मानले गेले आहे. मकर राशीत गुरुचे होत असलेले मार्गी चलन महत्त्वाचे मानले जात आहे.

दुसरा ग्रह म्हणजे नवग्रहांतील राजकुमार म्हणून ओळखला गेलेला बुध ग्रह. बुध आपले स्वामीत्व असलेल्या कन्या राशीत मार्गी होत आहे. बुध ग्रह हा बुद्धी, तार्किक क्षमता आणि व्यवसाय यांचा कारक मानला जातो. गुरु ग्रहाप्रमाणे बुधचे मार्गी चलनही महत्त्वाचे मानले गेले आहे.

बुध आणि गुरुचे या दोन्ही ग्रहांचे होत असलेले मार्गी चलन काही राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, लाभदायक ठरू शकेल. तर काही राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळात काही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, नेमक्या कोणत्या राशींना काय फायदा होईल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधचे मार्गी चलन पंचम भाव आणि गुरुचे मार्गी चलन नवम भावातून होत आहे. कुंडलीत ही दोन्ही स्थाने धर्म त्रिकोणातील मानली जातात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ शुभ मानला जात आहे. आपल्या जीवनातील अनेकविध क्षेत्रात शुभफल प्राप्त होऊ शकेल. तसेच एखादी मोठी संधी प्राप्त होऊ शकते. विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकेल. सुखाचा अनुभव घेऊ शकाल, असे सांगितले जात आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राशीस्वामी असलेल्या बुध ग्रहाचे मार्गी चलन मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकेल. तसेच गुरुच्या मार्गी चलनामुळे मानसिक शांतता तसेच उर्जेचा संचार होऊ शकेल. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना विशेष संधी प्राप्ती होणारा आगामी काळ ठरू शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी मिळू शकतील. शुभवार्ता मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

वृश्चिक राशीच्या अकराव्या भावात बुध तर तृतीय भावात गुरु ग्रहाचे मार्गी चलन होत आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी हे मार्गी चलन लाभदायक सिद्ध ठरू शकते. व्यवसाय, व्यापार, उद्योगात अपेक्षित यश मिळू शकते. तसेच मीडिया, अभिनय, राजकारण या क्षेत्रातील व्यक्तींसाठी आगामी कालावधी चांगला असेल. नवीन कार्यारंभ करण्यास चांगला काळ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी राशीस्वामी असलेल्या धनु ग्रहाचे होत असलेले सकारात्मक मानले जात आहे. तसेच बुधचे मार्गी चलन दशम भावात होत असून, यामुळे कार्यक्षेत्रात आणि सामाजिक स्तरावर आपले कौतुक होऊ शकेल. तसेच चांगला लाभ मिळू शकेल. कार्यक्षेत्रातील मंडळी आपल्यामुळे प्रभावित होतील. करिअरमध्ये नव्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. विशेष करून तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना विशेष लाभदायक काळ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुधचे मार्गी चलन सप्तम भाव आणि गुरुचे मार्गी चलन एकादश भावात होत असून, या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी कालावधी लाभदायक मानला जात आहे. विशेष करून व्यापार, व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल असू शकेल. अचूक वेळ साध्य केल्यास खूप मोठा नफा कमावण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. काही कारणामुळे झालेले गैरसमज चर्चेतून दूर होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

बुध आणि गुरु या राशींच्या मार्गी चलनासह शुक्र ग्रह आपले स्वामित्व असलेल्या तूळ राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान होत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत विराजमान होत असून, सूर्याच्या या संक्रमणाला तूळ संक्रांत असेही म्हटले जाते. तसेच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत विराजमान होत आहे.