नववर्षात नवचैतन्य हवे असेल तर वास्तुशास्त्राने सांगितलेल्या सहा गोष्टींचा घरात समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 03:51 PM2021-12-04T15:51:17+5:302021-12-04T15:56:34+5:30

प्रत्येकाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. २०२०-२१ अनेक संमिश्र घटनांनी युक्त होते. आता त्याची पडछायासुद्धा नवीन वर्षावर नको, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आजारांना, विषाणूंना, देशाच्या शत्रूला देशाबाहेर थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. आपणही त्यांनी दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहेच. शिवाय आपण आपल्या वास्तूच्या पातळीवर नकारात्मक शक्तींना घराच्या वेशीबाहेर कसे ठेवू शकू, यादृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. याचेच मार्गदर्शन वास्तुशास्त्रात केले आहे.

वास्तूत बदल किंवा काही गोष्टींना समाविष्ट करण्याबद्दल वाचले की सर्वसामान्य व्यक्तीला काहीतरी खर्चिक गोष्टी वाचायला मिळणार असे वाटते. तसा भ्रम निर्माण झाला आहे. परंतु वास्तुशास्त्रात साध्या सोप्या गोष्टींनी देखील वास्तुदोष दूर करता येतात आणि आपल्या वास्तूला सकारात्मक ऊर्जेचे कोंदण देता येते. त्यासाठी वास्तुशास्त्राने मुख्य ६ गोष्टी कोणत्या सांगितल्या आहेत, ते पाहू.

भगवान श्रीकृष्णाच्या कपाळाला शोभणारे मोरपंख खूप चमत्कारिक मानले जाते. असे म्हटले जाते की मोराचे पीस किंवा मोरपंखाची प्रतिमा आपल्या वास्तूत लावल्याने भाग्य बदलते. विशेषतः पती पत्नीच्या नात्यात गोडवा कायम राहावा म्हणून बेडरूममध्ये मोरपीस किंवा मोरपिसाचा प्रतिमा ठेवण्यास सांगितली जाते. जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठीदेखील आपल्या हिशोबाच्या वहीत किंवा आपल्या दैनंदिनीमध्ये मोरपीस ठेवावे. मोरपिसाचे रंग तुमच्या आयुष्यात उतरतील आणि तुमचेही आयुष्य सुखकर होईल.

देवघरात जपाची माळ ठेवतो तशी तुळशीची माळ देखील ठेवा. तुळशीची माळ गळ्यात घालणेदेखील उत्तम आहे. परंतु त्याचे पावित्र्यदेखील राखले गेले पाहिजे. अन्यथा ती देवघरात ठेवून पुजावी. तुळशी हरिप्रिया नावाने ओळखली जाते. जिथे तुळस किंवा तुळशीची माळ तिथे भगवंताचे अधिष्ठान कायम असते.

जर तुम्ही तुमच्या घरात मातीचे किंवा धातूचे कासव ठेवले तर ते खूप शुभ मानले जाते. घरात शांतता राहण्यासाठी तुम्ही चांदीचे, पितळ्याचे किंवा कास्याचे कासव घरात आणू शकता, परंतु हे कासव तुम्ही उत्तर दिशेला ठेवावे हे लक्षात ठेवावे. असे केल्याने कुटुंबात आनंद राहतो आणि नशीबही साथ देते. यासाठी खरे कासव घरात पाळण्याची गरज नाही. आपल्या स्वार्थासाठी त्याचा अधिवास हिरावून घेणे योग्य नाही, म्हणून धातूचे कासव हा पर्याय दिला आहे.

वास्तूशास्त्रामध्ये असे मानले जाते की पिरॅमिडचा आकार घरात ठेवल्यास घरातील वातावरण सकारात्मक बनते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील वातावरण सकारात्मक राहिल्यास कुटुंबातील लोकांमधील परस्पर समन्वय अधिक चांगला राहतो. एवढेच नाही तर घरातील लोकांचीही त्यांच्या क्षेत्रात प्रगती होते.

शास्त्रानुसार चांदीचा हत्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते, यामुळे घरात सुख-शांती आणि सुख-समृद्धी येते, एवढेच नाही तर नोकरीतही बढती मिळते. घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवावा. परंतु चांदीचा हत्ती ठेवणे सगळ्यांनाच परवडणारे नाही, त्याला पर्याय म्हणून लाकडी हत्ती ठेवता येईल. हत्ती हे लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे जिथे वाहन तिथे लक्ष्मीचा अधिवास अशी भावना असते.

शंख शिंपले गोळा करायची आवड आपल्याला बालपणापासूनच असते. परंतु हेच शिंपले आपल्या समृद्धीला कारणीभूत ठरणार आहेत, हे त्या वयात माहीतही नसते. वास्तुशास्त्र सांगते मोती रंगाचा शिंपला तुमच्या तिजोरीत ठेवला तर तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते, वृद्धी होते. केवळ दोन शिंपले आपल्या तिजोरीत ठेवण्यास सुरू करा आणि अनुभव घ्या!