कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:16 IST2025-02-07T14:03:47+5:302025-02-07T14:16:03+5:30
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत असेल तेव्हाच साडेसातीही सुरू असेल, तर काय उपाय केल्यास दिलासा मिळू शकतो? जाणून घ्या...

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नवग्रह, नक्षत्रे, कुंडली, स्थानांवर होणार प्रभाव आणि त्याचे परिणाम अशा गोष्टींचा अगदी बारकाईने अभ्यास करून अंदाज वर्तवले जातात. नवग्रहांमध्ये सर्वच ग्रह अतिशय महत्त्वाचे आणि विविध प्रकारे फले देणारे आहेत.
नवग्रहांमध्ये शनी हा मंदगतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीत शनी सुमारे अडीच वर्ष असतो. या काळात साडेसाती असते, असे म्हटले जाते. साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. मात्र, तसे नाही. शनी कर्मप्रधान असल्यामुळे तुमचे कर्म जसे असेल, त्याप्रमाणे फळ मिळते, अशी मान्यता आहे.
आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि ग्रह स्वराशीतून म्हणजेच स्वतःचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार असून, मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे.
केवळ साडेसाती नाही तर अनेकदा शनि ग्रहाचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले जाते. शनि ग्रहाचे स्थान कुंडलीत प्रतिकूल असेल किंवा शत्रू ग्रहाची दृष्टी शनि ग्रहावर असेल, तर त्यावेळेसही अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करावा लागतो. एखाद्या माणसाच्या कुंडलीत शनि ग्रह प्रतिकूल असेल, तर काही अशुभ लक्षणे दिसू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शनि ग्रह एखाद्याच्या कुंडलीत कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. असे लोक अनेकदा वाईट संगतीत पडतात. चुकीच्या वाईट सवयी लागतात. वारंवार पैशाचे नुकसान होते. कठोर परिश्रम, मेहनत करूनही यश मिळत नाही. नोकरी किंवा व्यवसायात समस्या येत राहतात. घरात आणि कुटुंबात शांतता राहत नाही. अशा लोकांना इतरांकडून फसवणूक होऊ शकते. मेहनत आणि परिश्रमाचे योग्य फळ मिळत नाही, अशी काही लक्षणे दिसू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
तुमच्या कुंडलीत शनि ग्रह प्रतिकूल किंवा कमकुवत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांनी शनिची कृपा, लाभ आणि आशीर्वाद मिळवू शकता. शनि ग्रह मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करणे. आळस झटकावा आणि कोणाची फसवणूक करू नये. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी शनि संबंधित वस्तूंचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते.
शनिवारी काळे तीळ, काळी द्राक्षे, चहाची पाने, मोहरीचे तेल आणि गुलाब जांभूळ दान करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि तिथे दिवा लावा. गरीब आणि गरजूंना मदत करा. त्यांच्या भावना कधीही दुखवू नका. घरात योग्य ठिकाणी बूट आणि चप्पल ठेवा. घराची पश्चिम बाजू नेहमी स्वच्छ ठेवा. पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना तर्पण अर्पण करा.
प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनि आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे म्हटले जाते. शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे.
नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कोणाचा अनादर करत असाल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, काही उपाय साडेसाती काळात उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो. शनिची कृपा लाभू शकते, असे सांगितले जाते.
शनि साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. ज्या लोकांना शनि महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनिधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
शनि बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा. शनिवारी शनि देवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनिची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनि चालीसा पठण, शनिदर्शन असे उपाय सांगितले जातात.
हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.