Holi 2025: होळीला 'या' चार देवतांच्या मंत्राचा जप कराल; तर आयुष्यभर नकारात्मकतेतून मुक्त व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:16 IST2025-03-06T10:13:54+5:302025-03-06T10:16:31+5:30

Holi 2025: यंदा १३ मार्च २०२५ रोजी होलिका दहन (Holi 2025) केले जाईल आणि १४ मार्च २०२५ रोजी रंगांची होळी खेळली जाईल. प्रथेनुसार होळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. यंदा १९ मार्च रोजी बुधवारी रंगपंचमी (Rangpanchami 2025) खेळली जाईल. हा उत्सव केवळ रंगांचा नाही, तर एकात्मतेचा, नव्या विचारांचा, नव्या नात्यांचा आहे. जुन्या गोष्टी विसरून, वाईट विचारांचे दहन करून होळी पासून प्रेम रंगात रंगून जावे, असे हा सण सुचवतो. त्याचे प्रतीकात्मक रूप म्हणजे होलिका दहन!

या निमित्ताने भक्त प्रल्हादाचीही गोष्ट सांगितली जाते. दैत्य राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त आहे, हे त्याला सहन होईना. म्हणून त्याने आपली असुर सेना कामाला लावून हर तऱ्हेने प्रल्हादाला त्रास देऊन पाहिला, मात्र विष्णूंच्या संरक्षण कवचाने त्याला काहीच अपाय झाला नाही. हे पाहून हिरण्यकश्यपूने शेवटचा उपाय म्हणून होलिका नामक आपल्या बहिणीला प्रल्हादासकट आगीत उतरायला सांगितले. होलिकेला आगीपासून बचावाचे वरदान होते. त्यामुळे तिला काही त्रास न होता प्रल्हाद जाळून भस्म होईल असे सर्वाना वाटले. मात्र तिची ही शक्ती वाईट कामासाठी वापरली असता आपला सर्वनाश होणार हे तिला माहीत नव्हते, म्हणून प्रल्हादाला घेऊन अग्निप्रवेश केला असता तिचे दहन झाले मात्र विष्णू कृपेने प्रल्हादाला अग्नितही दिव्य कवच मिळाले. तेव्हापासून वाईटावर चांगल्या वृत्तीचा विजय म्हणून होलिका दहन करण्याची आणि त्या दिवशी आपल्या नावडत्या व्यक्तीच्या नावे शिमगा करून वैर संपवण्याची प्रथा सुरु झाली.

मनातल्या वाईट विचारांचा, अंगातल्या वाईट वृत्तीचा, नात्यातील कटुतेचा निचरा होऊन नव्याने आयुष्याची सुरुवात करून देणारा हा सण म्हणजे पूर्वजांची समाजमनाचा विचार करून मांडलेले मानसशास्त्रच! या सणाला उपासनेची जोड म्हणून होलिका दहनाच्या वेळी पुढील मंत्र म्हणा असे सांगितले जाते.

महादेवाचा मंत्र : होलिकादहनाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कुटुंबातील सदस्यांना लाभ होईल. कारण शक्तिशाली महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भीती आणि रोगांपासून मुक्ती मिळते. हा महामृत्युंजय मंत्र आहे - ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्

लक्ष्मी मंत्र : या दिवशी लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास धनाची कमतरता दूर होते. तसेच आर्थिक लाभाचा मार्ग खुला होऊ शकतो. लक्ष्मीचा मंत्र - 'ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः।'

रुद्र गायत्री मंत्र : रुद्र गायत्री मंत्राचा या दिवशी जप केल्यास साधकाची पापे नष्ट होतात. या मंत्राचा कुटुंबातील सदस्यांनाही फायदा होतो. रुद्र गायत्री मंत्र- 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्'

विष्णू मंत्र : या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. तसेच प्रल्हादाला लाभले तसे विष्णू कवच लाभते. विष्णू मंत्र - 'ओम नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णु प्रचोदयात्।'