गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 02:03 PM2024-05-13T14:03:44+5:302024-05-13T14:08:55+5:30

गुरु शुभ तर केतु क्रूर ग्रह मानला गेला आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घ्या...

मे महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत विराजमान झाला आहे. सुमारे वर्षभर गुरू वृषभ राशीत असेल. गुरुच्या या राशीपरिवर्तनामुळे छाया ग्रह मानल्या गेलेल्या केतु ग्रहासोबत नवमपंचम योग जुळून आला आहे.

आताच्या घडीला केतु कन्या राशीत विराजमान आहे. राहु आणि केतु कायम वक्री चलनाने गोचर करतात. काही मान्यतांनुसार, नवमपंचम योग राजयोग मानला गेला आहे. गुरु आणि केतु यांचा नवमपंचम योग विशेष मानला गेला आहे. केवळ राशी नाही, तर देश-दुनियेवर याचा प्रभाव पडतो, असे सांगितले जाते.

गुरु हा शुभ ग्रह असून, केतु क्रूर ग्रह आहे. या दोन्ही ग्रहांचा हा राजयोग काही राशींना उत्तम फलदायी ठरू शकतो, तर काही राशींना संमिश्र ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींना गुरुबळ मिळून लाभ होऊ शकेल, कोणत्या राशींना आगामी काळात सावध राहावे लागेल, ते जाणून घेऊया...

मेष: नवपंचम राजयोग अनुकूल आणि लाभदायक ठरू शकेल. आर्थिक समस्या दूर होतील. व्यवसायात हळूहळू वाढ होईल. आयटी आणि संगणकाशी संबंधित व्यवसायात मोठे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा संयम आणि आत्मविश्वास वाढू शकेल. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. समस्या, अडचणीतून मार्ग मिळू शकतो.

मिथुन: नवपंचम राजयोग प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडवून आणू शकतो. आर्थिक योजना राबवण्यात यश मिळेल, याचे दूरगामी फायदे होतील. व्यापाऱ्यांना व्यवसायातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे. थोरल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने कामे पूर्ण होऊ शकतात.

सिंह: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवहार करणे टाळा. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात सहकाऱ्यांमुळे किंवा अधिकाऱ्यांमुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. खंबीर राहावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, मुलांशी संबंधित काही मुद्द्यावर जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.

धनु: नोकरदारांना सहकाऱ्यांमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामगिरी घसरेल. व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना सावध राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणत्याही मित्राला गुप्त गोष्टी सांगणे टाळा. कुटुंबातही चढ-उतार होऊ शकतील. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक शांती मिळू शकेल.

मकर: नवपंचम राजयोग सकारात्मक प्रभाव पाडू शकेल. सर्व प्रकारची रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राहील. कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकाल. एखाद्याला दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातील अधिकारी आणि सहकाऱ्यांशी वाद मिटतील. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कुंभ: चिंतेत असाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदार आणि व्यावसायिकांना त्यांच्या कामातून समाधान मिळणार नाही. अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस प्रतीक्षा करणे चांगले. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.