Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:54 IST2025-10-14T10:42:05+5:302025-10-14T10:54:27+5:30

Diwali Gift 2025: दिवाळीच्या(Diwali 2025) सुट्ट्या हे भेटीगाठीचे उत्तम निमित्त असते. या निमित्ताने आपण पाहुण्यांकडे जातो, पाहुणे आपल्याकडे येतात, सहलीचे आयोजन होते, फराळाची, मिठाईची देवघेव होते, त्याबरोबरच हा स्नेह वृद्धिंगत व्हावा म्हणून दिवाळीची आठवण भेट दिली जाते. तुम्हीसुद्धा भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर पुढील ६ गोष्टी मात्र यादीतून वगळून टाका.

वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत ६ प्रकारच्या वस्तू भेट म्हणून देऊ नयेत. अशा काही गोष्टी आहेत ज्या भेट म्हणून दिल्यास नात्यांमध्ये दुरावा येतो आणि तुमच्या जीवनातील सुख आणि शांतीवर नकारात्मक प्रभाव पडतो. चला तर जाणून घेऊया त्या ६ वस्तू कोणत्या...

दिवाळीत काहीतरी युनिक भेटवस्तू द्यावी असा आपल्या सगळ्यांचा हट्ट असतो. अशी वस्तू जी वापरली जाईल आणि ती वापरताना आपली आठवणही होईल. किंवा अशी वस्तू जिचा वापर नाही, पण ती घराच्या शोभेत भर घालेल किंवा सतत डोळ्यासमोर राहिल्याने आपली आठवण येत राहील. भेटवस्तू देण्यामागे आपला हेतू शुद्ध असला तरी पुढील ६ वस्तू देण्याची चूक करू नका.

दिवाळीत घड्याळ भेट म्हणून दिले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार घड्याळ काळाशी संबंधित असते. ही भेटवस्तू तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ हातातून निसटून नेऊ शकते. एखाद्या व्यक्तीला वेळ द्या, पण वेळ दर्शवणारे घड्याळ भेट म्हणून देऊ नका.

अनेक जणी आपल्या बहिणीला, आईला, मैत्रिणीला, नात्यातल्या अनेकींना रोजच्या वापरात येतील अशा सुऱ्या, कात्री सेट भेट म्हणून देतात. परंतु वास्तू शास्त्रानुसार धारदार वस्तू भेट देणे हे नात्याच्या दृष्टीने नकारात्मक ठरते. भेट जरी उपयुक्त असली तरी त्यामुळे नात्याला कात्री लागू शकते.

आजच्या काळानुसार परफ्यूम हा लोकांना गिफ्ट करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग मानला जातो, परंतु बजेटनुसार परफ्यूम योग्य असू शकतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार, कृत्रिम सुगंध असलेले परफ्यूम भेट देणे योग्य ठरत नाही. त्याऐवजी चांगल्या प्रतीचे अत्तर भेट म्हणून देऊ शकता किंवा सण समारंभाच्या प्रसंगी वापरता येईल अशी अत्तर दाणी देउ शकता.

वास्तुशास्त्रानुसार, आपण कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेट देऊ नये. कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेट दिल्याने नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि ज्या व्यक्तीला तुम्ही रुमाल किंवा टॉवेल देत आहात त्या व्यक्तीशी तुमचे नाते बिघडू शकते किंवा दुरावण्याची परिस्थिती उद्भवू शकते. थोडा संदर्भ लक्षात घेतला तर कळेल, की एखाद्या व्यक्तीच्या दुखवट्यात, सांत्वनाला जाताना आपण या वस्तू देतो, त्यामुळे शुभ प्रसंगी भेटवस्तू म्हणून तिचा वापर करू नये.

दिवाळीत तुमच्या प्रियजनांना काळे कपडे भेट देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा अंधाराशी संबंधित मानला जातो, तर दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे दिवाळीत कोणालाही काळ्या रंगाचे कपडे भेट देऊ नका किंवा दानही करू नका. शक्य तेवढे रंग स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करा. अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, दिवाळी भेट म्हणून देवाची मूर्ती किंवा तसबीर कोणालाही देऊ नका. गणपती, नवरात्रीत जसे देवाचे आपल्या घरी आगमन होते, तसे लक्ष्मी पूजेला लक्ष्मीचे आगमन होते. तसेच दिवाळीच्या निमित्ताने देवाला नैवेद्य दाखवून आपण त्यांना फराळाला बोलवतो, पाहुणचार करू असे भक्तिभावाने सांगतो. त्यामुळे या कालावधीत देवाची मूर्ती, प्रतिमा दुसऱ्याला भेट देऊ नये. इतर वेळी दिली तर हरकत नाही.