ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:58 IST2025-07-30T14:53:02+5:302025-07-30T14:58:11+5:30
Chopdai Devi Yatra 2025: श्रावण शुद्ध षष्ठीला सुरु होते चोपडाई देवीची यात्रा. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र जोतीबा मंदिरात हा उत्सव दरवर्षी केला जातो. या यात्रेचे महत्त्व म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला देवी चोपडाई देवीने रत्नासुराचा वध केला असा उल्लेख केदार विजय ग्रंथात आढळतो. त्यामुळे या यात्रेला अनन्य साधारण महत्व आहे.

दरवर्षी यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह विविध राज्यांतील तब्बल तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त केला जातो. मात्र भाविक अतिशय शिस्तबद्धपणे या यात्रेचा आनंद घेतात आणि ज्योतिबा व आई भगवतीच्या दर्शनाने पावन होतात.
आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रेचे वैशिष्टय हे की, श्रावणषष्ठी दिवशी देवींने रत्नासुराचा वध केला म्हणून श्रावणषष्ठीला जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते. या मागे आणखी एक उपकथा सांगितली जाते की -
रत्नासुराशी झालेल्या युद्धानंतर देवीच्या शरीरात प्रचंड दाह झाला आणि तो दाह शांत करण्यासाठी देवीला लिंबू , दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करण्यात आले, म्हणून या यात्रेनिमित्त देवीची पूजा, दाहकता शांत करणाऱ्या लिंबू, दुर्वा आणि बेल अशा वनस्पतीमध्ये बांधण्यात येत असते ही यात्रा रात्रभर असते.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण षष्ठीला चोपडाई देवीची महापूजा बांधण्यात येते. ती वर्षातून एकदाच बांधली जाते. रात्रभर मंदीरात चोपडाई देवीचा जागर सोहळा होतो आणि दुसऱ्यादिवशी म्हणजेच सकाळी धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होते.
बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी केलेली ही महाअलंकारिक महापूजा आणि सतीश भिवधरणे यांनी काढलेले हे सुंदर फोटो तुम्हाला कसे वाटले हे आवर्जून सांगा.