शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चातुर्मासारंभ: सण-उत्सवांची रेलचेल, ऋतुचक्र अन् जीवशैलीचा अद्भूत मेळ; व्रतांचा सात्विक काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:09 AM

1 / 15
Chaturmas 2023: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा, वैविध्यांनी नटलेला आणि सण-उत्सव, व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला चातुर्मास सुरू झाला आहे. यंदाच्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक मास. या वर्षीच्या चातुर्मास काळात श्रावण महिना अधिक आला आहे. यामुळे हा काळ पाच महिन्यांचा झाला आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो.
2 / 15
आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासात अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यंदा २९ जून २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चातुर्मास असणार आहे. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. सन २०२० मध्ये अश्विन महिना अधिक आला होता. तर यंदा सन २०२३ ला श्रावण महिना अधिक आला आहे.
3 / 15
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत. चातुर्मास काळात आपला आहार कसा असावा, याबाबतही सांगण्यात आले आहे. आपल्याकडील अनेक सण-उत्सव निसर्गचक्रानुसार साजरे करण्याची परंपरा आहे. याची वैज्ञानिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे.
4 / 15
आषाढ महिन्यातील पावसाचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते. पुढे श्रावणात पावसाचा जोर कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ रंगतो. श्रावण महिन्यापासूनच पुढे भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्यापर्यंत आपल्या संस्कृतीत सण, उत्सव यांची रेलचेल असते. हाच उत्सव आपण ‘चातुर्मास’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदींसाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो.
5 / 15
आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी’ एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात, ते कार्तिक शुद्ध एकादशीस झोपेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी असेही म्हटले जाते.
6 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवसांत सूर्य कर्क राशीत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जी काही व्रत-वैकल्ये, सर्व सण-उत्सव हे भारतीय ऋतुचक्राशी निगडीत आहेत. याची सांगड आपले दिनचर्या, आहार-विहार यांच्याशी आपल्या पूर्वसुरींनी घालून ठेवली आहे. त्याचा संबंध आरोग्याशीही आहे.
7 / 15
ऋषी-मुनींनी त्या त्या ऋतुमानात आपण कसे वागायचे, याची सांगड सण-उत्सव आणि आपल्या आरोग्याशी घातली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत आपली पचनशक्ती मंद झालेली असल्याने या काळात पचण्यास हलका आणि कमी आहार घ्यावा असे सांगितले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदही ते मान्य करतो.
8 / 15
चातुर्मासाच्या काळात तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणाही व्रत म्हणून करावी, असे सांगितले आहे. तुळस ही कफ, वातशामक, जंतुनाशक आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारी सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर तुळस हे रामबाण औषध आहे. श्रावण महिन्यातील मंगळागौरी देवीची पूजा झाल्यानंतर रात्री विविध खेळ खेळून जागविली जाते. या खेळात फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि अन्य काही खेळ असतात.
9 / 15
महिलांच्या शारीरिक आरोग्यासाठी हे सर्व खेळ पूरकच आहेत. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी ‘पत्री’ म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने लागतात. या सर्व औषधी असून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या पूजेच्या निमित्ताने का होईना या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होईल, असा उद्देश या मागे होता.
10 / 15
श्रावण महिना म्हणजे पावसाचा मध्य. या काळात आपल्या पोटातील अग्नी मंद झालेला असल्याने व्रत-वैकल्य, उपास याच्या माध्यमातून आपले आरोग्य सांभाळणे हा या चातुर्मासाचा मुख्य उद्देश. या दिवसात कमीतकमी आणि पचायला हलके असा आहार घ्यावा. अश्विन महिना म्हणजे पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते.
11 / 15
पावसाळ्यात मंद झालेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याचा हा काळ असतो. कमकुवत झालेले शरीर बलवान करायचे असते. त्याची सुरुवात म्हणून या दिवसात एक धान्य फराळ, जे धान्य खाल ते भाजून खा, शक्तीचा संचय करा, असे सांगितले जाते.
12 / 15
अश्विन महिन्यात आणि शरद ऋतूत येणाऱ्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या काळात थंडीला सुरुवात झालेली असल्याने कफविकार वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेले आटीव गरम दूध पिऊन आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
13 / 15
चातुर्मासाच्या काळात कांदा, लसूण यांचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. चातुर्मासाचा बहुतांश काळ हा पावसाळ्याचा असतो. या कालावधीत एकूणच आपली पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे या काळात कमी, हलका आणि पचायला सहज सोपा असा आहार घ्यावा, असे सांगितले जाते. कांदा, लसूण चातुर्मासात वर्ज्य आहेत.
14 / 15
मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठीही चांगले नाही. त्यामुळेच पूर्वजांनी या चार महिन्यांत कांदा, लसूण खाऊ नका, असे सांगितले आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातील पहिली नवमी 'कांदे नवमी' म्हणून साजरी केली जाते.
15 / 15
या दिवशी कांद्याची भजी करून खाल्ली जातात, कांद्याचा विपुल प्रमाणात वापर केला जातो. नंतर कांदा खाऊ नये, त्यासाठी आधी ही सोय सांगितली आहे. मांस-मटण, मासे हेही पचायला जड असतात. त्यामुळे त्याचेही सेवन करू नये असे सांगितले गेले आहे.
टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीShravan Specialश्रावण स्पेशलReligious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक