Ashadhi Ekadashi 2021 : आज दिवसभरात थोडा वेळ काढून एक यादी करा आणि येत्या चतुर्मासात संकल्प सोडू नका, तर संकल्प धरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:34 PM2021-07-19T12:34:23+5:302021-07-19T12:45:57+5:30

Ashadhi Ekadashi 2021: नव्याचे नऊ दिवस, ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे आणि त्याची प्रचितीही घेतली आहे. आपण अनेक बाबतीत आरंभशुर असतो, म्हणजे नवनवीन पायंडे पाडण्यात आपल्याला रस असतो, परंतु त्यात सातत्य ठेवणे जमत नाही. यासाठीच आपण वारंवार संकल्प करत असतो. कधी नववर्ष म्हणून, कधी नवीन महिना म्हणून तर कधी नवा दिवस म्हणून! आपल्या धर्मशास्त्राने देखील चतुर्मासाचा काळ आपल्याला संकल्प करण्यासाठी आणि त्यात सातत्य राखण्यासाठी आखून दिला आहे.

प्रत्येकाचे ध्येय व्यक्तिपरत्त्वे वेगवेगळे असते. ऐश्वर्य, आरोग्य, अध्यात्म, लोकसंग्रह, ग्रंथवाचन, पारायण, दानधर्म असे अनेक विषय आहेत. प्रत्येकाची अभिरुची वेगळी. परंतु, त्यासाठी वेळ काढणे होत नाही. म्हणून या चार महिन्यांत आपल्या आवडीची किंवा देवाला आवडेल अशी गोष्ट सलग चार महिने करायची, असा संकल्प करायचा. संकल्प सोडणे असे रूढार्थाने म्हणत असले, तरी संकल्प धरणे असा त्याचा शब्दशः अर्थ घेतला पाहिजे.

पावसाळ्यातले चार महिने पचनशक्तीवर ताण पडू नये म्हणून धर्मशास्त्राने अनेक गोष्टी निषिद्ध सांगितल्या आहेत. त्या गोष्टी व्रतस्थ होऊन सोडल्या तर त्याचा शरीराला निश्चित लाभ होईल. प्रामुख्याने पालेभाज्या सोडून फळभाज्या व कडधान्यांनवर भर द्या असे म्हटले आहे. पालेभाज्या सोडल्यामुळे कडधान्यातून प्रथिन, लोह व अन्य आवश्यक बाबी शरीराला पोषक ठरतात. तसेच दूध, दही, ताक यांचा जास्तीत जास्त वापर करून आहार संतुलन सांगितले आहे.

या काळात हातून अरिष्ट घडू नये म्हणून व्रत वैकल्य सांगितली आहेत. त्यानिमित्ताने देवाचे नामस्मरण, पूजा अर्चा, निसर्गाचे सान्निध्य व त्याचे महत्त्व या गोष्टी आपसुख घडतात. तसेच या काळात पोथीवाचन, ग्रंथ वाचन सुरु केले असता, रोज थोडे थोडे करत चार महिन्यांत ग्रंथ वाचन पूर्ण करता येते.

या काळात पावसामुळे धन धान्य तसेच इतर क्षेत्रांतही लाक्षणिक वाढ होत असल्यामुळे बचतीला पुष्कळ वाव असतो. तसेच लग्नकार्य, मुंज, वास्तुशांत असे सोहळे होत नसल्यामुळे पैशांची साठवणूक, गुंगवणूक मोठ्या प्रमाणात करता येते.

या चार महिन्यांत नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, पिठोरी अमावस्या इ. सण येतात. त्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी आयते निमित्त मिळते. पुढच्या पिढीलाही सणांची सविस्तर ओळख होते. तसेच पावसाळी सहलीचा मनमुराद आनंद घेता येतो.

पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. तसेच सूर्यदर्शनही दुर्लभ असते. पावसामुळे प्रभात फेरी होत नाही. जिम मध्ये वरचेवर सुट्या होतात. अशा वेळेस घरच्या घरी सूर्य नमस्काराचा संकल्पही करता येईल. तसेच योगासनांची जोड देता येईल. चार महिने सातत्याने केलेला व्यायाम चतुर्मास समाप्तीच्या वेळेस सुदृढ आरोग्य देणारा ठरू शकेल. चला तर तयारीला लागा आणि आजच आपली 'बकेट लिस्ट' तयार करून उद्यापासून कामाला लागा.