जगज्जेत्या पी.व्ही. सिंधूला घरातूनच मिळाले बाळकडू; जाणून घ्या, तिच्या प्रवासाबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:37 PM2019-08-26T14:37:20+5:302019-08-26T14:40:01+5:30

स्वित्झर्लंड, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली.

या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत. सिंधूनं 2013 व 2014 मध्ये कांस्यपदक जिकंले, तर 2017 व 2018मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सिंधूचा जन्म 5 जुलै 1995 मध्ये हैदराबाद येथे झाला. सिंधूचे पूर्ण नाव पुसरला वेंकट सिंधू असे आहे. तिचे वडिल पी व्ही रमन्ना आणिआई पी विजया हे दोघेही व्हॉलीबॉलपटू होते. सिंधूच्या वडीलांना 2002मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सिकंदराबाद येथील भारतीय रेल्वे इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल इंजीनिअरींग अॅण्ड टेलीकम्यूनिकेशनच्या बॅडमिंटन कोर्टवर प्रशिक्षण देणाऱ्या महबूब अली यांच्याकडून सिंधूने प्रथम बॅडमिंटनचे धडे गिरवले. पुलेला गोपीचंद यांचा खेळ पाहून सिंधूनेही बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. काही काळानंतर तिने पुलेला गोपिचंद अकादमीत प्रवेश घेतला आणि सरावाला सुरुवात केली.

2012च्या आशियाई युवा ( 19 वर्षांखालील) अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवले होते आणि तेव्हा ती चर्चेत आली. 2013मध्ये तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

2013मध्ये तिने मकाऊ ओपन ग्रां. प्री. स्पर्धेत कॅनडाच्या मिशेल ली हीला नमवून जेतेपद नावावर केले होते.

2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने महिला एकेरिच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु तिला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभव पत्करावा लागला. सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली.

सिंधूला 2013मध्ये अर्जुन पुरस्कार, 2015मध्ये पद्म श्री पुरस्कार आणि 2016मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.