Yamaha RX100: मस्तच! एक ऱ्हिदम..एक आवाज...तरुणाईच्या काळजाचा ठाव घेणारी Yamaha RX100 रिलॉन्च होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 02:12 PM2022-07-19T14:12:47+5:302022-07-19T14:18:33+5:30

Yamaha RX100: भारतात नव्वदीच्या दशकात तरुणाईच्या मनामनांत रुतून बसलेली दुचाकी यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) पुन्हा भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे.

Yamaha RX100: भारतात नव्वदीच्या दशकात तरुणाईच्या मनामनांत रुतून बसलेली दुचाकी यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) पुन्हा भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. यामाहा मोटार इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानानं (Eishin Chihana) यांनी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) रिलॉन्च करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे जसेच्या तसे जुने मॉडल आणणं शक्य नसलं तरी आरएक्स-१०० ची जुनी ओळख कायम राहील आणि आधुनिकतेचाही मुलामा बाइकला असेल याची काळजी घेण्यात येणार आहे.

RX-100 च्या नव्या मॉडलला पावरफुल इंजिन आणि डिझाइनसह येत्या काही वर्षांत लॉन्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.

९० च्या दशकात भारतीय रस्त्यांवर Yamaha RX100 ची अक्षरश: मक्तेदारीच होती असं म्हटलं तरी वावंग ठरणार नाही. स्लिम ट्रीम लूक, सायलंसरचा एकच ऱ्हिदम आणि एकच आवाज...नुसता आवाज कानी पडला की सर्वांची नजर वळायची. आवाजावरुन RX100 ओळखली जायची.

यामाहा आरएक्स-१०० रिलॉन्च करण्याची तयारी कंपनी करत आहे. पण यात तांत्रिक अडचणी येत आहे. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे आरएक्स-१०० टू-स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होती. सध्या टू-स्ट्रोकसह बीएस-६ इंजिनला अनुकूल असं इंजिन तयार केलं जाऊ शकत नाही.

आरएक्स-१०० चं नवं मॉडेल वेगळ्या इंजिनसह आणि आधुनिक पद्धतीनं सादर केलं जाईल. पण त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. कारण यामाहा जवळ २०२५ पर्यंतचे लॉन्चिंग लाइनअप आहेत. त्यामुळे आरएक्स-१०० त्याआधी लॉन्च करणं खूप कठीण असल्याचं कंपनीचे चेअरमन चिहाना यांनी सांगितलं.

आरएक्स-१०० सारखं इंजिन उपलब्ध करुन देता येणार नसलं त्यामुळे नव्या मॉडलंच नाव देखील वेगळं असणार आहे. कारण नव्या मॉडेलमुळे आरएक्स-१०० च्या ब्रँड इमेजला धक्का पोहोचण्याचा धोका कंपनी पत्करणार नाही. त्यामुळे आरएक्स-१०० चं नवं मॉडल नवीन पद्धतीनं तयार केलं जाणार आहे.

यामाहा कंपनीनं आरएक्स-१०० ला बाजारात आणण्यासाठी एक व्यवस्थित प्लान तयार केला असल्याचीही माहिती चेअरमन चिहाना यांनी दिली आहे. त्यामुळे आरएक्स-१०० नव्यानं भेटीला येणार हे निश्चित झालं आहे.

यामाहा कंपनीनं १९८५ च्या सुमारास RX100 भारतीय बाजारात आणली होती. त्यावेळी खास जपानवरुन ५ हजार बाइक मागवण्यात आल्या होत्या. बाइकचं वजन फक्त ९८ किलो, इंजिन १०० सीसी, ११ बीएचएच टू-स्ट्रोक इंजिन आणि ७,५०० चा RPM सह उपलब्ध होती. RX100 नं लॉन्च होताच भारतात धुमाकूळ घातला होता.

आरएक्स-१०० बाइकची क्रेझच काही वेगळी होती. कॉलेजच्या तरुणाईचं आकर्षण होती. अगदी सिनेमात हिरो असो किंवा व्हिलन...स्टंटसाठी आरएक्स-१०० चीच निवड केली जायची. त्यावेळी ही बाइक १९ हजार रुपयांना मिळत होती.