५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:22 IST2025-06-26T11:19:10+5:302025-06-26T11:22:12+5:30

जर तुमची सॅलरी दर महिना ५० हजार असेल आणि तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करताय? तर थोडं थांबा..घाईघाईत घेतलेला निर्णय तुमच्या महिन्याचे आर्थिक बजेट बिघडवू शकते. या बजेटमध्ये काही कार अशा आहेत ज्या खरेदी करणे तुमच्यासाठी योग्य नाही तर तोट्याचा सौदा ठरू शकतो
त्यामुळे कार घेताना आधी त्यामागचे गणित समजून घ्या. कोणती कार तुम्हाला घेणे योग्य ठरेल, कोणत्या कारपासून लांब राहिले पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे एका आर्थिक फॉर्म्युल्यामागे लपली आहे. हा फॉर्म्युला आहे २०-४-१०...हा फॉर्म्युला नेमका काय आहे जाणून घेऊया.
हा फॉर्म्युला एखाद्या मार्गदर्शकासारखा काम करतो, जो तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार किती महागडी कार खरेदी करायला हवी, कसे त्यावर कर्ज घ्यायला हवे यासारख्या अनेकावर हा फॉर्म्युला उपाय आहे.
२० टक्के डाऊन पेमेंट - तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल तर त्या कारच्या ऑन रोड किंमतीच्या कमीत कमी २० टक्के तुमच्याकडे पैसे असायला हवेत. त्यातून कारच्या उर्वरित रक्कमासाठी घेतले जाणारे कर्ज आणि त्यावरील व्याजही कमी होईल.
कमाल ४ वर्षाचा कर्ज कालावधी - तुम्ही कार खरेदी करताना जर कर्ज घेण्याचा विचार करताय तर यासाठी लागणारा कर्जाचा कालावधी ४ वर्षापेक्षा जास्त नको. अधिकचा वेळ तुम्ही कर्जासाठी घेतला तर त्यावरील व्याजाचा बोझा वाढतच राहतो.
१० टक्के EMI नियम - कार खरेदी केली, कर्ज काढले पण EMI भरण्याचा ताप तुमच्या कायम मागे लागतो. त्यामुळे जर कारसाठी कर्ज घेतले असेल तर त्यासाठी लागणारा EMI हा तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या १० टक्क्यापेक्षा जास्त नसायला हवा. जेणेकरून अन्य खर्चांसाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध असतील.
कसा काम करतो हा फॉर्म्युला? - जर तुमची महिन्याची सॅलरी ५० हजार आहे तर तुमचा मासिक EMI ५ हजारांपेक्षा अधिक नको. त्याशिवाय तुम्हाला कारच्या किंमतीपैकी २० टक्के म्हणजे १.२ लाख रुपये डाऊन पेमेंट करायला हवे. उर्वरित रक्कम तुम्ही कर्जाद्वारे ४ वर्षासाठी बँकेतून घेऊ शकता.
कोणती कार योग्य राहील? - या पगारात तुम्हाला अशा कारचा शोध घ्यायला हवा ज्याची ऑन रोड किंमत ७-८ लाखांच्या आत असेल. त्यामुळे EMI ५ हजाराच्या मर्यादेत राहील. डाऊन पेमेंटही जास्त द्यावे लागणार नाही. सोबतच या कारचा मेन्टेन्स आणि इंधनावरील खर्चही कमी असतो.
या कारपासून दूर राहिले पाहिजे - ५० हजार पगारात तुम्ही साधारणपणे १० लाखांहून अधिक किंमतीच्या कार खरेदीपासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा तुमचा मासिक EMI १० हजार ते १५ हजारांपर्यंत पोहचू शकतो. जे तुमच्या सॅलरीच्या २०-३० टक्के असू शकते त्यामुळे तुमचा आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता जास्त असते.
कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा - कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे मासिक बजेट तपासून पाहा. मुलांच्या शाळेची फी, घरचा खर्च आणि अन्य देयके यांचा हिशोब लावा. त्यानंतर तुम्ही कारच्या EMI साठी आवश्यक रक्कम बाजूला करू शकता का हेदेखील तपासा.