Toyota Innova Hycross Hybrid Launch : टोयोटाची हायब्रिड एमपीव्ही लाँच, पाहा Exclusive Photos; जाणून घ्या फीचर्स

By जयदीप दाभोळकर | Published: November 25, 2022 02:56 PM2022-11-25T14:56:59+5:302022-11-25T15:01:36+5:30

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनं भारतीय बाजारपेठेत आपली एमपीव्ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस लाँच केली आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनं भारतीय बाजारपेठेत आपली एमपीव्ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross Hybrid Launch) लाँच केली आहे. ही कार पेट्रोल आणि हायब्रिड या दोन्ही ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. कंपनीनं या कारचं बुकिंग आजपासूनच सुरू केल्याची माहिती लाँचदरम्यान देण्यात आली आहे.

या एमपीव्हीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अनेक स्मार्ट फीचर्सही देण्यात आले आहेत. या कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्सही देण्यात आलेत. ही कार जानेवारी 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर याचा लूक अतिशय बोल्ड आहे. यामध्ये हनिकॉम्ब मेश ग्रिल, स्लिकर हेडलँप्स आणि अपराईड प्रोफाईल देण्यात आली आहे. यामुळे याचा लूक अतिशय उत्तम होतो. तसंच यात 18 इंचाचे मोठे अलॉय व्हिल्स, टेपिंग रुफ, 100 एमएम मोठा व्हिलबेस, रॅपअराऊंड एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेनसह सादर करण्यात आली आहे. याचं पहिलं इंजिन 2.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 174 पीएसची पॉवर आणि 205 एनएमचा टॉर्क जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी या व्हेरिअंटमध्ये सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तर दुसरं इंजिन 2.0 लिटर स्ट्रॉन हायब्रिड इंजिन आहे. हे इंजिन 152 पीएसची पॉवर आणि 187 एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये ई-सिव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आलेय. ही कार 21.1 किमी प्रति लिटरचं मायलेज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.

इनोव्हा हायक्रॉसच्या इंटिरिअरबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा सपोर्ट मिळतो. याशिवाय यात जेबीएल साऊंड सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲडजेस्टेबल कॅप्टन सिट्स, ड्युअर 10 इंच रिअर टचस्क्रिन सिस्टम, एडीएएस फीचर्स, ॲम्बिअन्स लाईच आणि सनरुफ देण्यात आलं आहे.

हायब्रिड इलेक्ट्रीक कार ZX, ZX (O), VX 8S, VX 7S या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. तर गॅसोलिन GX 8S, GX 7S, G7S G 8S या व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. दरम्यान, या कारचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. परंतु कंपनीनं या कारच्या किंमतीचा खुलासा मात्र केलेला नाही.

टॅग्स :टोयोटाToyota