या मेड-इन-इंडिया कारवर अख्ख जग फिदा; ८० देशांमध्ये विक्री, काय आहे खास? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:25 IST2025-07-24T17:17:45+5:302025-07-24T17:25:30+5:30
२ वर्षांपूर्वी ही कार भारतात लॉन्च झाली होती.

सुमारे २ वर्षांपूर्वी भारतात लॉन्च झालेल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. मारुती फ्रॉन्क्सने २५ महिन्यांत १ लाखाहून अधिक युनिट्सचा निर्यातीचा टप्पा ओलांडला. हा आकडा भारताच्या ऑटोमोबाईल निर्यात उद्योगासाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. मारुती सुझुकीने म्हटले की, त्यांची फ्रॉन्क्स ही भारतातील सर्वात वेगाने निर्यात होणारी क्रॉसओवर एसयूव्ही बनली आहे.
मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स कार फक्त गुजरात प्लांटमध्ये तयार केली जाते. एप्रिल २०२३ मध्ये भारतात लॉन्च झाली आणि त्याच वर्षीपासून तिची निर्यातदेखील सुरू झाली. ही कार आज लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आफ्रिका सारख्या मोठ्या बाजारपेठांसह ८० हून अधिक देशांमध्ये पाठवली जाते. जपानमध्ये तर तिला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळेच निर्यातीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
मारुती सुझुकीच्या मते, आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ६९,००० हून अधिक फ्रॉन्क्स परदेशात पाठवल्या गेल्या. यामुळे ती त्या वर्षी भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी प्रवासी कार बनली. यावरुन असे दिसून येते की, कंपनीची निर्यात सतत वाढत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करत आहे.
मारुती सुझुकी सलग चार वर्षे भारतातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्यातदार राहिली आहे. आर्थिक वर्ष २५-२६ च्या पहिल्या तिमाहीतच कंपनीने ९६,००० हून अधिक कार परदेशात पाठवल्या. हे भारताच्या एकूण प्रवासी वाहन निर्यातीत ४७% चा आहे. सध्या कंपनी सुमारे १०० देशांमध्ये १७ वेगवेगळे मॉडेल पाठवते. तिच्या मुख्य बाजारपेठांमध्ये दक्षिण आफ्रिका, जपान आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण ३.३ लाखांहून अधिक वाहने परदेशात निर्यात केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १७.५% जास्त आहे. फ्रॉन्क्स व्यतिरिक्त, जिमनी, बलेनो, स्विफ्ट आणि डिझायर यांनीही या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतातील फ्रॉन्क्सची किंमत ₹ ७.५४ लाख ते ₹ १३.०६ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.
फ्रॉन्क्स ही मारुती सुझुकीची एकमेव कार आहे, ज्यामध्ये टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ९९ बीएचपीची पॉवर आणि १४७ एनएमचा टॉर्क देते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक (पॅडल शिफ्टरसह) गिअरबॉक्सचा पर्याय आहे. याशिवाय, यात १.२ लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे ८९ बीएचपीची पॉवर आणि ११३ एनएमचा टॉर्क देते. फ्रॉन्क्सचे सीएनजी व्हेरिएंटदेखील त्याच १.२ लिटर इंजिनवर आधारित आहे.