भारतात बनलेल्या या पाच कारची परदेशातही धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:48 IST2018-09-25T15:41:50+5:302018-09-25T15:48:46+5:30

जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतातच उत्पादन सुरु केले आहे. यामुळे अमेरिकेच्या फोर्डसह फोक्सवॅगन, ह्युंदाई यांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र, या कंपन्यांच्या भारतीय बनावटीच्या कार भारतापेक्षा परदेशातच जास्त विकल्या जात आहेत. निर्यातीमध्ये फोर्ड इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे.

फोर्ड इकोस्पोर्ट
भारतात बनलेली फोर्ड इंडियाची कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) इकोस्पोर्टची निर्यात सर्वाधिक आहे. 2017-18 मध्ये कंपनीने 90,599 इकोस्पोर्ट कार निर्याते केल्या आहेत. यामध्ये वार्षिक 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2015 मध्ये इकोस्पोर्टला दक्षिण ऑफ्रिका, तैवान, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्यात करण्यात आले. तर 2017 मध्ये या कारला अमेरिकेमध्येही निर्यात करण्यास सुरुवात झाली.

शेवरोले बीट
भारतात जनरल मोटर्सने विक्री करण्याचे बंद केले असले तरीही त्यांच्या प्रकल्पांमध्ये शेवरोलेच्या कार बनत आहेत. मात्र, या कार भारतात जरी विकल्या जाणार नसल्या तरीही त्या कारना परदेशात मोठी मागणी आहे. शेवरोलेची बीट ही कारची या वर्षी 83,140 एवढी निर्यात करण्यात आली. यामध्ये 17.53 टक्के वाढ झाली.

फोक्सवॅगन वेंटो
फोक्सवॅगनने भारतीय ग्राहकांसाठी कॉम्पॅक्ट सेदान प्रकारात वेंटो ही कार आणली होती. मात्र, ही कार भारतापेक्षा परदेशातच जास्त विकली जात आहे. या वर्षी कंपनीने 77,005 कार निर्यात केल्या आहेत. यामध्ये 7.64 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

फोर्ड फिगो
भारतातून निर्यात होणाऱ्या कारच्या यादीमध्ये फोर्डची आणखी एक कार सहभागी आहे. ती म्हणजे हॅचबॅक प्रकारातील फिगो. या वर्षी कंपनीने 61,241 कारची निर्यात केली आहे. ही वाढ 19 टक्के आहे.

ह्युंदाई क्रेटा
देशातील दोन नंबरची कंपनी ह्युंदाईची प्रिमियम श्रेणीतील क्रेटाचा निर्यात होणाऱ्या कारमध्ये पाचवा क्रमांक लागतो. या वर्षी क्रेटाची 50,820 कार परदेशात निर्यात करण्यात आली आहेत.

















