भारतात 'गेमचेंजर' ठरणार TATA ची नवी कोरी कार; ६२७ किमी रेंज, लाईफटाइम वॉरंटी, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:04 IST2025-06-03T17:00:51+5:302025-06-03T17:04:47+5:30

काही कंपन्या अशा असतात, ज्यांच्या उत्पादनाच्या एन्ट्रीने बाजारात खळबळ माजते. टाटा मोटर्सने त्यांच्या ईव्ही सेगमेंटमध्ये असाच काही करण्याचा प्रयत्न केला आहे. मीडियाने खचाखच भरलेल्या गर्दीत टाटा मोटर्सने त्यांची नवीन इलेक्ट्रीक एसयूव्ही Harrier EV अधिकृतपणे मार्केटमध्ये लॉन्च केली, तेव्हा हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. बाजारात नवी कार लॉन्च झाली, यासाठी या टाळ्या नव्हत्या तर टाटाने लॉन्च केलेल्या कारमध्ये जे काही फिचर्स पाहायला मिळाले, ते इतर वाहनांमध्ये नाहीत. भारतीय बाजारपेठेत तर बिल्कुल नाहीत. त्यामुळे लोकांनी टाळ्यांनी त्याचे कौतुक केले.
मॅट ब्लॅक कलरची टाटा हॅरियर इलेक्ट्रिक कार विना चालक पुढे येत स्टेजच्या मध्यभागी पोहचली तेव्हा सगळ्यांचे डोळे अवाक् झाले. या कारच्या पुढील सीटवर कुणीच नव्हते, मागील बाजूस कंपनीचे अधिकारी बसले होते. खरेतर ही कार रिमोटली ऑपरेट करण्यात आली होती. हा नवीन रिमोट पार्किंग सिस्टम फिचर कमाल होता. जो आज टाटा मोटर्सने जगासमोर आणला. नव्या टाटा हॅरियरमध्ये जे जबरदस्त फिचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यातून ही कार बाजारातील इतर कारपेक्षा वेगळी ठरते.
टाटा मोटर्सने आज भारतीय बाजारपेठेत त्यांची नवी कोरी इलेक्ट्रिक कार TATA Harrier EV अधिकृतपणे लॉन्च केली. कंपनीने ही एसयूवी कार जानेवारी महिन्यात भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये दाखवली होती. आकर्षक लूक, दमदार बॅटरी बॅकअपसह या एसयूवीची सुरुवातीची किंमत २१.४९ लाख एक्स शोरूम इतकी आहे. येत्या २ जुलैपासून या कारचे बुकिंग सुरू होणार असून विशेष म्हणजे त्यावर लाईफटाईम वॉरंटी कंपनीने दिली आहे. लाँन्चच्या एक दिवस आधी, टाटा मोटर्सने नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या ऑफ-रोड क्षमता दाखवणारा एक व्हिडिओ जारी केला. त्यात व्यावसायिक ऑफ रोडर डॉ. मोहम्मद फहीद हे केरळमधील एलिफेंट रॉकवर एसयूव्ही चढवताना दिसतात.
व्हिडिओमधील स्थानिक लोक एलिफंट रॉकवर वाहन चढवणे हे एक प्राणघातक आव्हान असल्याचं सांगतात. हॅरियर ईव्हीने सर्व आव्हानांवर मात केली. त्यानंतर हॅरियरचा हा कारनामा लोकांच्या चर्चेत आला आहे. हॅरियर ईव्ही ही acti.ev+ आर्किटेक्चरवर बनवली आहे.
ती ड्युअल-मोटर क्वाड-व्हील-ड्राइव्ह (QWD) सिस्टम आणि अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह समोर आणली आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात एक मजबूत स्पर्धा निर्माण करणार आहे. ही बाजारात महिंद्रा XUV.e9 आणि क्रेटा ईव्ही सारख्या मॉडेल्सला तगडी टक्कर देणार आहे.
कंपनीने हॅरियर ईव्हीमध्ये मूळ मॉडेलची बोल्ड आणि मस्क्युलर स्टाईलिंग कायम ठेवली आहे. यात डिझेल आवृत्तीप्रमाणेच डे-टाइम-रनिंग लाइट्स (डीआरएल) आणि हेडलॅम्प आहेत. परंतु त्यात नवीन ग्रिल आणि बंपर आहे जे तिला एक वेगळी ओळख देते. बाहेरील बाजूस शार्प क्रिज आणि क्लीन लाइंस दिसतात. याशिवाय, LED DRL तिला अधिक आकर्षक बनवते.
हॅरियर इलेक्ट्रिकमध्ये ड्युअल-मोटर सेटअप दिला आहे जो क्वाड-व्हील-ड्राइव्ह आणि ५०० एनएमचा पीक टॉर्क आउटपुट देतो. ही एसयूव्ही ५०० किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल असा दावा टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) चे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी केला.
हॅरियर ईव्हीमध्ये ऑफ-रोड असिस्ट मोड देखील आहे, जी एका विशिष्ट वेगाने ऑफ-रोड क्रिप सेटिंगसारखे काम करते. ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टम पारदर्शक बोनेटचे दृश्य दिसून येते. जे सहसा अधिक प्रीमियम एसयूव्हीमध्ये दिसते. यात स्नो,सँन्ड आणि रॉक क्रॉलसह अनेक भिन्न ऑफ-रोड ड्रायव्हिंग मोड आहेत.
हॅरियर इलेक्ट्रिकच्या केबिनमध्ये ३६.९ सेमी सॅमसंग निओ क्यूएलईडी इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय १०.२५ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. हे दोन्ही हॅरियर डिझेलपेक्षा वेगळे आहेत. या कारला चावीची गरज नाही तर तिला तुमच्या स्मार्टफोननेही ऑपरेट करता येऊ शकते. त्यात सेल्फ पार्किंग सुविधाही मिळते.
हॅरियर इलेक्ट्रिकचा मोठा बॅटरी पॅक ( 75Kwh) व्हेरिएंट एका चार्जवर ६२७ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे असा टाटा मोटर्सचा दावा आहे तर रियल वर्ल्डमध्ये हा व्हेरिएंट ४८० किमी ते ५०५ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. जे वेगवेगळ्या परिस्थितीवर निर्भर आहे. त्याची बॅटरी फक्त १५ मिनिटांत इतकी चार्ज होईल जेणेकरून तुम्ही २५० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकाल.