6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 08:25 PM2021-09-14T20:25:53+5:302021-09-14T20:30:32+5:30

TATA International चं स्वामित्व असलेल्या कंपनीनं लाँच केली जबरदस्त Electric Cycle.

टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या स्वामित्व असलेल्या सहाय्यक कंपनी Stryder नं देशांतर्गत बाजारात आपल्या दोन इलेक्ट्रीक सायकल्स लाँच केल्या आहेत. ETB-100 आणि वोल्टिक 1.7 E अशी या सायकल्सची नावं आहेत.

या सायकलचा लूकही अतिशय आकर्षक असून यामध्ये दमदार बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या इलेक्ट्रीक सायकल्स दमदार कामगिरी करणाऱ्या असून त्यांची रनिंग कॉस्ट 6 पैसे प्रति किमी असेल असा दावा कंपनीनं केला आहे.

एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. कॉन्टिनो ईटीबी-100 ही देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रीक सायकल आहे आणि गेम चेजिंग प्रोडक्ट आहे. तर दुसरीकडे Voltic 1.7 पॉवरफुल इलेक्ट्रीक मोटर आणि लिथियम आयन बॅटरीनं युक्त आहे.

या दोन्ही सायकल्स तीन तासांपर्यंत चार्ज केल्या जाऊ शकतात. तसंच या दोन्ही सायकल्सवर कंपनीकडून दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी देण्यात येते. Voltic 1.7 मॉडेलची किंमत 29,995 रूपये इतकी आहे.

ETB-100 मध्ये कंपनीनं जागतिक दर्जाच्या फीचर्सचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही सायकल प्रामुख्यानं भारतीयांना ध्यानात ठेवून तयार करण्यात आली आहे.

7 स्पीड कॉन्टीनो इटीबी 100 डिटेचेबल, रिचार्जेबल बॅटरी आणि इलेक्ट्रीक, हायब्रिड, पेडल अशा तीन ड्रायव्हिंग मोड्ससह येते. हायब्रिड मोड्स अंतर्गत कंपनी 60 किलोमीटर पर्यंत आणि पूर्ण इलेक्ट्रीक मोडमध्ये सायकल ३० किमीपर्यंत रेंज देते.

सहजरित्या ही सायकल पॅडल आणि मोटरमोडवर शिफ्ट करता येते. या सायकलची किंमत 37,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. Contino ETB-100 मध्ये मजबूत स्पेशल 6061 मेटलचा वापर करण्यात आला आहे.

उत्तम ब्रेकिंगसाठी यात डबल डिस्क ब्रेक, की लॉक बॅटरी, स्मार्ट राईड, नाईट विजन, फ्रन्ट एलईडीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये डिटॅचेबल बॅटरी पॅकही देण्यात आला आहे. ही सायकल निळ्या आणि काळ्या या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या सायकल्समध्ये रिचार्जेबल 48V लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी तीन तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. या सायकल्समध्ये सस्पेन्शन फॉर्क, मोठे टायर्स, 260W इलेक्ट्रीक मोटरचाही वापर करण्यात आला आहे. काही ठराविक डिलर्सच्या माध्यमातून ही सायकल भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीनं याबाबतची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.