New Traffic Rule: सर्व कागदपत्रे दाखविली, हेल्मेट घातले तरी ट्रॅफिक पोलीस २००० ची पावती फाडणार; नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:12 PM2022-09-18T16:12:29+5:302022-09-18T16:17:45+5:30

वाहतुकीचे नियमच एवढे आहेत, की ते जर पाळायचे म्हटले तर वाहन चालविणे अवघड होऊन जाईल. लाख वाहनचालकांमागे केवळ १००० लोकांनाच हे सर्व नियम माहिती असतील. कुठे सर्कल पुढून मारायचे, तर कुठे सर्कलच्या आदीच वळायचे... असे त्या त्या विभागांनी घातलेले नियम तर वेगळेच. अशातच आणखी एक नियम समोर येत आहे. तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असली तरी तुम्हाला एक चूक २००० रुपयांची पावती फाडण्यास कारणीभूत ठरू शकते.

तुमच्याकडे पीयुसी, आरसी बुक, लायसन, हेल्मेट एवढेच नाही तर तुम्ही स्लिपर ऐवजी सँडल किंवा बुटजरी घातलेला असेल तरी देखील वाहतूक पोलीस तुम्हाला २००० रुपयांचा दंड बजावू शकतात. मोटर व्हेईकल अॅक्टनुसार जर तुम्ही कागदपत्रे दाखवत असताना वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घातला किंवा अरेरावी केलात तर नियम १७९ नुसार तुम्हाला २००० रुपयांचा दंड होऊ शकतो.

पोलीस कर्मचाऱ्याशी आपण एखाद्या गोष्टीवरून वाद घालतो आणि तो वाद इतका वाढतो की त्याचे रुपांतर गैरवर्तनात होते, असे अनेकदा दिसून आले आहे. जर पोलिसाने तुमच्याशी गैरवर्तन केले तर तुमच्याकडे त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा आणि प्रकरण न्यायालयात नेण्याचा पर्याय आहे. यामुळे वाहनचालकाने वाहतूक पोलीसांशी वाद घालत बसू नये.

नवीन वाहतूक नियमांनुसार तुम्ही खराब हेल्मेट घातल्यासही 2000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुम्ही मोटारसायकल, स्कूटर चालवताना हेल्मेट घातले नसेल, तर नियम 194D MVA नुसार तुमचे 1000 रु.चे चलन कापले जाते. मात्र, तुम्ही हेल्मेट घातलेले असेल आणि ते बीआयएस किवा आयएसआय हॉलमार्कचे नसेल तर विनाहेल्मेट समजून एकूण २००० रुपयांची पावती फाडली जाऊ शकते.

तुम्ही कोणता वाहतुकीचा नियम मोडलाय का, हे तपासण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्थितीचा पर्याय निवडा. तुम्हाला पावती क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Details' वर क्लिक करा. आता तुम्हाला तुम्ही नियम मोडला असेल तर त्याची पावती दिसेल.

दंड ऑनलाईन भरण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलनाशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि तपशील मिळवा वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल ज्यावर पावतीचे तपशील दिले जातील. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा व पैसे भरा.