Ratan Tata: एकेकाळी अख्खी कंपनीच विकायला निघालेले रतन टाटा; आज एवढी नफ्यात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 10:54 AM2021-09-16T10:54:07+5:302021-09-16T11:00:57+5:30

Ratan Tata Success story, Tata Motors: टाटा मोटर्सला त्यांनी फक्त तोट्यातूनच बाहेर काढले नाही, तर ही कंपनी आता गुंतवणूकदारांना मालामालही करू लागली आहे. या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास टाटांना फोर्डकडून घेतलेल्या जग्वार लँड रोव्हर मदत झाली आहे.

फोर्डने भारतातून जवळपास एक्झिट निश्चित केली आहे. सध्याच्या ग्राहकांना फोर्ड पुढील 10 वर्षे सेवा देणार आहे. याच फोर्डला एकेकाळी तोट्यातील टाटा मोटर्स विकण्यासाठी रतन टाटा (Ratan Tata) प्रयत्नशील होते.

त्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. त्यावेळी फोर्डच्या मालकाने रतन टाटांना तुच्छ लेखून अपमानास्पद वागणूक दिली होती. आज हीच टाटा मोटर्स (Tata Motors) नफ्यात आहे आणि फोर्डने (Ford) तोटा होतो म्हणून भारतातून पळ काढला आहे. (Ratan Tata went to Ford to sell Tata Motors; Now Ford Exit India, and tata motors in Profit.)

फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स विकत घेण्याची तयारी दाखविली होती. परंतू तेव्हा त्याने हे करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. यामुळे आत्मसन्मानाला ठेच लागल्याने टाटांनी तो व्यवहार रद्द केला आणि भारतात परतले.

काही वर्षांनी रतन टाटांनी फोर्डला डोईजड ठरणारी कंपनी जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) विकत घेतली होती. गेल्या काही वर्षांत ही कंपनी जरी तोट्यातच असली तरी या कंपनीला टाटा मोटर्स पोसत आहे. हा सारा पैसा टाटा मोटर्सच्या फायद्यातून वळता केला जात आहे. टाटांनी टाटा मोटर्सला एवढी सक्षम कंपनी बनविले आहे.

टाटा मोटर्सला त्यांनी फक्त तोट्यातूनच बाहेर काढले नाही, तर ही कंपनी आता गुंतवणूकदारांना मालामालही करू लागली आहे. या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास टाटांना फोर्डकडून घेतलेल्या जग्वार लँड रोव्हर मदत झाली आहे.

नवनवीन डिझाईन, फिचर्स आणि सेफ्टी यामध्ये टाटाच्या कारनी मोठी झेप घेतली आहे. यामुळे टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांची पसंती ठरू लागली आहे.

गेल्या दहा वर्षांत टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमवून दिला आहे. 14 सप्टेंबर 2011 ला कंपनीचा शेअर हा 140.99 रुपये होता. तर या वर्षीच्या 14 सप्टेंबरला हाच शेअर 306.05 रुपयांवर बंद झाला होता. या काळात टाटा मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना 117 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

जर तेव्हा एखाद्याने टाटा मोटर्समध्ये 1 लाख रुपये गुंतविले असते, तर त्याला 709 शेअर मिळाले असते. आज त्याची किंमत ही 306.05 रुपयांच्या हिशेबाने 2.17 लाख रुपये झाली असती. टाटा मोटर्सचे शेअर जून महिन्यात ऑल टाईम हाय होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या शेअरमध्ये घसरण पहायला मिळाली होती.

टाटा मोटर्सचे बाजारमुल्य हे 1 लाख कोटींहून अधिक आहे. सध्या मार्केट कॅप हे 1,01,618.02 कोटी रुपये आहे.