बहुप्रतिक्षित Maruti Jimny लॉन्च; थेट Mahindra Thar शी टक्कर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 06:49 PM2023-01-16T18:49:23+5:302023-01-16T18:53:12+5:30

Maruti Jimny : मारुती सुझुकी इंडियाने ऑटो एक्सपोमध्ये बहुप्रतिक्षित ऑफरोडिंग एसयूव्ही Maruti Jimny सादर केली आहे.

Maruti Jimny : मारुती सुझुकी इंडियाने ऑटो एक्सपोमध्ये आपली बहुप्रतिक्षित ऑफरोडिंग एसयूव्ही मारुती जिमनी (Maruti Jimny) सादर केली आहे. मारुती जिमनीचे हे 5-डोअर व्हर्जन सादर करण्यासोबतच कंपनीने याची अधिकृत बुकिंगही सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ऑफ रोड SUV ने अवघ्या दोन दिवसात 3,000 हून अधिक बुकिंग मिळवले आहेत. कंपनीच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपद्वारे किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या गाडीचे बुकिंग करता येईल. या SUV साठी बुकिंग रक्कम 11,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

कशी आहे नवीन मारुती जिमनी? Maruti Jimny मध्ये, कंपनीने 1.5-लिटर K-Series Natural Aspirated पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 103 bhp ची मजबूत पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करते. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हे जुने इंजिन आहे, कंपनी आपल्या नवीन मॉडेल्समध्ये K15C इंजिन वापरणार आहे.

हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय फोर-व्हील ड्राइव्ह (4X4) ऑल ग्रिप प्रो सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हे तंत्रज्ञान एसयूव्हीच्या ऑफरोडिंग क्षमतांमध्ये सुधारणा करते.

आपण गाडीच्या आकाराबद्दल बोललो, तर त्याची लांबी 3,985 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि उंची 1,720 मिमी आहे. तर, गाडीचा व्हीलबेस 2,590mm आहे, जो तीन-डोअर व्हर्जनपेक्षा 340mm अधिक आहे.

एसयूव्हीच्या मागील बाजूस असलेले स्पेअर व्हील याला योग्य ऑफरोडिंग एसयूव्ही लुक देते. बॉक्सी डिझाईन असलेली ही एसयूव्ही दोन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. एक स्टील ग्रे आणि दुसरा लेमन ग्रीन.

ही खास वैशिष्ट्ये मिळतात: कंपनी मारुती जिमनीमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देत आहे. SUV मध्ये 6-एअरबॅग्ज, ब्रेक (LSD) लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, हिल होल्ड असिस्टसह ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह इतर वैशिष्ट्ये आहेत.

कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सहजतेने धावण्यास सक्षम आहे. मारुती जिमनीच्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, परंतु ही देशातील सर्वात परवडणारी फोर-व्हील ड्राइव्ह ऑफ-रोडिंग एसयूव्ही असल्याचे सांगितले जात आहे. लाँच करण्यापूर्वी त्याच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.

असे मानले जात आहे की कंपनी ही एसयूव्ही 10 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते. आता या एसयूव्हीची किंमत काय ठेवली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जिमनी ही थारची स्‍पर्धक मानली जाते. अलीकडेच थारचे टू-व्हील ड्राईव्‍ह व्हेरिएंट 9.99 लाख रुपयांच्‍या प्रारंभिक किमतीत लॉन्‍च केले गेले आहे.

प्रतीक्षा कालावधी किती असू शकतो: मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ऑफरोडिंग SUV च्या डिलिव्हरीसाठी 3 महिने वाट पाहावी लागेल. याचा खरा वेटिंग पीरियड किती आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मारुती सुझुकीवर आधीच इतर मॉडेल्सच्या डिलिव्हरींचा जास्त भार आहे.

नुकत्याच लाँच झालेल्या मारुती ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा ही प्रमुख वाहने आहेत, ज्यासाठी ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत नवीन मॉडेल बाजारात आल्यानंतर प्रतीक्षा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो.