Mahindra ची दमदार ऑफर! ‘या’ कारवर मिळतेय ८१ हजारांची सूट; लाभ घेण्याची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:45 PM2022-02-14T18:45:07+5:302022-02-14T18:49:03+5:30

महिंद्रा आपल्या काही लोकप्रिय कारवर भरघोस सूट ऑफर करत आहे. पाहा, डिटेल्स...

आताच्या घडीला भारतीय बाजारांमध्ये स्वदेशी कार निर्माता कंपन्यांनी धमाकेदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे Mahindra कंपनी. गेल्या अनेक महिन्यांपासून महिंद्रा अँड महिंद्रा अनेक कंपन्यांना मागे टाकत पुढे जात आहे.

सेमीकंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे कारची डिलिव्हरी आणि उत्पादन यांना फटका बसला आहे. ग्राहकांनी बुक केलेल्या कारची डिलिव्हरी देणे कंपन्यांना शक्य होत नाहीए. त्यामुळे वेटिंग पीरियड वाढत चालला आहे. याचा सर्वाधिक फटका महिंद्रा कंपनीला बसत असल्याचे बोलले जात आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी फेब्रुवारी महिन्यात काही कारवर भरघोस सूट देत आहे. कंपनीने या महिन्यासाठी निवडक मॉडेल्सवर ८१ हजार ५०० रुपयांतची सूट दिली आहे. मात्र यात एस्कयूव्ही ७००, थार किंवा बोलेरो निओ एसयूव्ही सारख्या फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश नाही.

महिंद्रा अँड महिंद्रा सर्वात मोठी सवलत त्यांच्या लाइनअपमधील सर्वात महागड्या एसयूव्हीवर ऑफर करत आहे. Alturas G4 एसयूव्हीवर फेब्रुवारीमध्ये ८१,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. Alturas G4 वर ५० हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह कॉर्पोरेट सूट आणि अतिरिक्त ३१ हजार ५०० रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर दिल्या जात आहे.

Alturas G4 एसयूव्ही भारतात २.२ लिटर डिझेल इंजिनसह Alturas G4 2WD आणि 4WD पर्यायांमध्ये येते. या कारची किंमत २८.८५ लाखापासून सुरू होते आणि ३१.८५ लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. Alturas G4 भारतीय बाजारपेठेत टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरशी स्पर्धा करते.

Mahindra ने आपली सर्वांधिक सेफ कार मानल्या जाणाऱ्या XUV300 वर सवलत दिली गेली आहे. या कारवर ६९ हजार रुपयांपर्यंतची सूट ऑफर केली जात असून, ३० हजार रुपयांच्या रोख सवलती व्यतिरिक्त, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि १० रुपये किमतीचे इतर सवलती दिल्या जात आहेत.

Mahindra XUV300 चे फेसलिफ्ट लवकरच भारतीय बाजारात सादर केले जाणार आहे. महिंद्रा कंपनीने XUV300 एसयूव्ही १६ प्रकारांमध्ये आणली आहे. बेस १.२ -लीटर पेट्रोल W4 व्हेरियंटची किंमत ८.१६ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक व्हेरिएंट १.५-लीटर डिझेल ऑटोमॅटिक W8 ट्रिमसाठी १३ लाख ६७ हजारापर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

महिंद्राची परवडणारी एसयूव्ही KUV100 NXT ला देखील ६० हजारांपेक्षा जास्त सूट मिळते. या गाडीसाठी ३८ हजारंची रोख सवलत देत इतर सवलती मिळून ही रक्कम ६० हजारांपर्यंत जाते.

या तीन एसयूव्ही व्यतिरिक्त महिंद्रा या महिन्यात स्कॉर्पिओसाठी ३४ हजारांपर्यंत आणि बोलेरो एसयूव्हीसाठी २४ हजार रुपयांपर्यंतची सूट देते.