24 तासात 1780 KM धावली Hero ची Electric Scooter, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:47 PM2023-05-11T13:47:48+5:302023-05-11T13:52:14+5:30

भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Hero Vida: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची(टू-व्हिलर आणि फोर व्हिलर) मागणी झपाट्याने वाढत आहे. पण, अजूनही काहीजण याच्या रेंजबाबत संभ्रमात आहेत. टू-व्हिलरच्या बाबतीत पहिला प्रश्न असतो की, याची रेंज किती आहे?

सध्या बाजारात असलेल्या बहुतांशी स्कूटर एका चार्जमध्ये 100 किमी पेक्षा कमी रेंज देतात. पण Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक स्कूटर Vida ने असा विक्रम केला आहे की, ज्यामुळे या स्कूटरचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

हिरो विडाने 24 तास सतत प्रवास करुन जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम केला आहे. कंपनीच्या जयपूरस्थित हिरो सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीच्या टीमने ही कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरो विडा स्कूटरने 24 तासांत 1780 किलोमीटरचे अंतर कापले.

आश्चर्याची बाब म्हणजे एवढे लांबचे अंतर इलेक्ट्रिक स्कूटरने कसे कापले? हिरो सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीच्या टीमने रिले बनवून ही कामगिरी केली. एकामागून एक स्कूटर आणि तिची बॅटरी सतत बदलली गेली आणि 1106.4 मैल म्हणजेच 1780 किलोमीटर अंतर कापले गेले.

20 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान हा विक्रम प्रस्थापित झाला. यापूर्वी कोणत्याही इलेक्ट्रिक दुचाकीने सर्वात लांब अंतर कापण्याचा विक्रम 350 किलोमीटर होता, जो आता हिरोने मोडला आहे. या विक्रमानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले.

हा रेकॉर्ड बनवण्याचे संपूर्ण श्रेय जयपूर आणि जर्मनी येथील आमच्या संशोधन आणि विकास संघाला जाते. विडा V1 बनवण्यात विविध प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, आम्हाला आमची ईव्ही मालिका जगभरात पाहायची आहे.

कंपनी सध्या स्कूटरचे दोन प्रकार, Vida V1 plus आणि Vida V1 Pro ऑफर करते. ही स्कूटर एका चार्जमध्ये 165 किमी कव्हर करू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे. या स्कूटरची किंमत 1.45 लाख रुपयांपासून सुरुवात होते.