सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:06 IST2025-09-19T14:01:43+5:302025-09-19T14:06:58+5:30
GST Impact on Used Cars: डीलर्सनी जुन्या मालकाकडून किंमत पाडून कार खरेदी केली होती, ती कार ते मोठे मार्जिन ठेवून विकत होते.

जीएसटीमध्ये बदल झाल्याने नव्या कोऱ्या वाहनांच्या किंमती उतरल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून कार कंपन्यांनी जीएसटी कपातीनंतरची किंमत जाहीर केली आहे. आता नव्या कारच्या किंमतीच दीड-दीड लाखाने कमी झाल्याने सेकंड हँड कार डीलर्स, कंपन्यांमध्ये पळापळ सुरु झाली होती.
या डीलर्सनी जुन्या मालकाकडून किंमत पाडून कार खरेदी केली होती, ती कार ते मोठे मार्जिन ठेवून विकत होते. आता जीएसटी कमी झाल्याने घेतलेल्या किंमतीला किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला जुन्या कार विकण्याची वेळ या डीलर्सवर आली आहे.
जीएसटी कमी झाल्याने आता सेकंड हँड कारच्या मार्केटमध्येही डिस्काऊंट सुरु झाले आहेत. या डीलरना कारच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. स्पिनी, कार्स २४ सारख्या मोठमोठ्या ब्रँडनी जुन्या कारच्या किंमती दोन लाखांपर्यंत कमी केल्या आहेत. छोट्या, मोठ्या डीलर्सवरही याचा परिणाम होणार आहे.
जुन्या कारच्या विक्रीवरील जीएसटीमध्ये काही बदल झालेला नाही. परंतू, नव्या कारच्या किंमती कमी झाल्याने आता त्या कमी झालेल्या रकमेपेक्षा जास्त किंमती कमी कराव्या लागल्या आहेत.
स्पिनीनुसार पारदर्शिता आणि ग्राहकांच्या भरवशाला कायम ठेवण्यासाठी आम्ही जुन्या कारच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने या कारवर २ लाखांपर्यंतची सूट जारी केली आहे.
कार्स २४ ने आपल्याकडील जुन्या कारच्या किंमती ८० हजार रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. या जीएसटी कमी झाल्याचा फटका जुनी कार विकणाऱ्या वाहन मालकांनाही बसणार आहे. कारण त्यांच्या कारच्या किंमती देखील कमी होणार आहेत. डीलर, एजंट जीएसटीचे आणखी एक कारण सांगून कारच्या किंमती पाडून मागणार आहेत.