भन्नाट! जेवढे गाडीचे रनिंग, तेवढ्याचाच इन्शुरन्स भरा; नवी पॉलिसी आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 20:22 IST2020-04-30T20:03:32+5:302020-04-30T20:22:23+5:30
अनेकांचे केवळ आठवड्याला किंवा महिन्याला येणे-जाणे होते. यामुळे ते वर्षाचे १०००० किमींचे सर्व्हिस लिमिटही पूर्ण करत नाहीत. तर अनेकांचे एकाच महिन्यात किंवा काही महिन्यात १०००० किमी पूर्ण होतात. या दोघांनाही तेवढेच पैसे मोजावे लागतात.

रस्त्यावर कार किंवा कोणतेही वाहन चालविताना इन्शुरन्स असणे महत्वाचे आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. मात्र, याआधी वर्षासाठी वाहनाच्या किंमत आणि वयानुसार इन्शुरन्ससाठी पैसे मोजावे लागत होते.

अनेकांना घरासमोर गाडी तर हवी पण वापर कमी असला तरीही काही हजारांत वाहन चालविणाऱ्यांएवढीच रक्कम मोजावी लागत होती.

यामुळे जेवढे बोलाल तेवढ्या सेकंदाचे पैसे या प्रमाणे आता वाहनांच्या इन्शुरन्स सेक्टरमध्येही क्रांतीचे पाऊल पडले आहे. यापुढे जेवढे किमी वाहन चालेल त्या प्रमाणे इन्शुरन्सचसाठी रक्कम मोजावी लागणार आहे.

अनेकांचे केवळ आठवड्याला किंवा महिन्याला येणे-जाणे होते. यामुळे ते वर्षाचे १०००० किमींचे सर्व्हिस लिमिटही पूर्ण करत नाहीत. तर अनेकांचे एकाच महिन्यात किंवा काही महिन्यात १०००० किमी पूर्ण होतात. या दोघांनाही तेवढेच पैसे मोजावे लागतात.

हा एकप्रकारचा अन्याय किंवा असमतोलपणा म्हणण्यात येत होता. कमी रनिंग असलेल्या वाहनांची रिस्कही कमीच असते. तर जास्त रनिंग असलेल्या वाहनांच्या अपघाताची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा वर्षाला वाहनाचे एका पेक्षा जास्त अपघातही होतात.

हा मुद्दा लक्षात घेऊन एका कंपनीने ही भन्नाट पॉलिसी आणली आहे. याद्वारे जेवढे तुमचे रनिंग तेवढे इन्शुरन्सचे पैसे, अशी भूमिका ठेवली आहे.

खासगी विमा कंपनी Bharti AXA General Insurance (भारती एक्सा जनरल इन्शुरन्स) ने ही सोय केली आहे. PolicyBazaar.com सोबत मिळून भारती एक्साने ही नवीन वाहन विमा पॉलिसी लाँच केली आहे.

या पॉलिसीची निवड करताना वाहन धारकाला त्याची वर्षाला किती गाडी धावणार आहे, त्याचा अंदाज कंपनीला द्यावा लागणार आहे. यानंतर त्या किमीनुसार रक्कम सांगितली जाईल.

यासाठी कंपनीने तीन टप्पे ठेवलेले आहेत. पहिला टप्पा २५०० किमींचा असणार आहे. दुसरा टप्पा ५००० किमींचा असणार आहे. तिसरा टप्पा ७५०० किमींचा असणार आहे. यापैकी एक टप्पा निवडावा लागणार आहे.

इरडानेच अशा पॉलिसीचे कंपन्यांकडे प्रस्ताव ठेवलेले होते. सँडबॉक्स असे या प्रस्तावाचे नाव होते. याद्वारे आता अन्य कंपन्याही पुढे येण्याची शक्यता आहे.

जास्त रनिंग झाले तर काय?
समजा तुम्ही २५०० रनिंग निवडला आणि तुमचे रनिंग जास्त परंतू ४००० झाले तर फरकाच्या रनिंगचे जादा पैसे कंपनीला द्यावे लागतील. मात्र, निवडलेल्या टप्प्यापेक्षा कमी रनिंग झाले तर त्याची कोणतीही भरपाई मिळणार नाही.


















