खूशखबर...आता वाहन चोरीवर बसणार लगाम; सरकारच ट्रॅक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:44 PM2019-10-07T15:44:48+5:302019-10-07T15:48:57+5:30

देशभरात वाहनचोरीच्या घटना कमालीच्या होत असतात. ही चोरलेली वाहने गुन्ह्यांमध्येच नाही तर दहशतवादी हल्ल्यांसाठीही वापरली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच सर्व वाहने ट्रॅक करणार आहे.

सरकारने या दिशेने एक पाऊल टाकले आहे. देशातील सर्व वाहन निर्मात्या कंपन्यांना आणि डिलर्सना विक्री झालेल्या वाहनांचा डेटाबेस एका रचनेत गोळा करून देण्याचे आदेश दिले आहेत.

4 ऑक्टोबरला हे आदेश देण्यात आले असून एका महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्यात येणार आहे. या नंबरप्लेटमध्ये जीपीएसची एक चिप लावली जाणार आहे. या चिपच्या मदतीने पोलिस नियंत्रण कक्ष आणि आरटीओ कोणत्याही वेळी वाहन कुठे आहे हे पाहू शकणार आहे.

एवढेच नाही डुप्लिकेट नंबर प्लेट बनविण्यापासून रोखण्यासाठी लेझर मार्क आणि होलोग्राम सारखे फिचरही या नंबरप्लेटमध्ये असणार आहेत. या सगळ्याचा एकच उद्देश असून तो म्हणजे गाडी चोरीपासून रोखणे.

वाहन कंपन्यांची संघटना सियामनेही या नंबरप्लेट देण्यासाठी डीलरनी यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे. बाहेरून करण्याचे तंत्रज्ञान वापरल्यास या नंबरप्लेटची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

सरकारच्या या पावलामुळे तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा किंवा कारमध्ये जीपीएस सिस्टिम लावण्याची गरज भासणार नाही.