तयार व्हा..! या तारखेला लॉन्च होणार स्वस्त Mahindra Thar, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:13 PM2023-01-04T20:13:50+5:302023-01-04T20:16:18+5:30

महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच Thar चे स्वस्त मॉडेल लॉन्च करत आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राची प्रसिद्ध SUV महिंद्रा THAR पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स आणि स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते. थारच्या नवीन फाइव्ह-डोअर मॉडेलची बर्‍याच दिवसांपासून चर्चा आहे. यातच आता कंपनी कमी किमतीत एक नवीन मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्र थारच्या परवडणाऱ्या व्हेरिएंटचे काही फोटो आणि डिटेल्स ऑनलाइन लीक झाले आहेत. येत्या 9 जानेवारी रोजी ही नवीन थार बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

या किफायतशीर थारची खास गोष्ट म्हणजे यात नवीन डिझेल इंजिन मिळेल, तसेच ही थार टू-व्हील ड्राईव्ह (2WD) तंत्रज्ञानासह येईल. सध्याची महिंद्रा थार बाजारात ऑल-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानासह येते आणि हे एसयूव्हीचे सर्वात मोठे आकर्षण आहे. हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या रस्त्यांवर दमदार परफॉर्मेंस देण्यात मदत करते. साहजिकच, नवीन थार परवडण्याजोगे आहे, परंतु त्यात काही फिचर्स वगळले जाऊ शकतात. या नवीन थारच्या केबिनमध्येही किरकोळ बदल अपेक्षित आहेत.

रिपोर्टनुसार, महिंद्रा थार ही नवीन पॉवरट्रेन म्हणून सादर केली जाईल. कंपनी आता ही SUV नवीन 1.5-लीटर डिझेल इंजिनसह लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही सध्याच्या 2.2-लीटर (डिझेल) आणि 2.0-लीटर (पेट्रोल) इंजिन असलेल्या थारसोबत विकली जाईल. या नवीन इंजिनमुळे, ही SUV देखील नवीन टॅक्स ब्रॅकेटमध्ये सहजपणे बसू शकेल. या SUV ची लांबी फक्त 3,985 mm असेल.

इंटरनेटवर लीक झालेल्या डेटानुसार, नवीन Mahindra Thar 2WD (टू-व्हील ड्राइव्ह) एकूण दोन प्रकारांमध्ये येईल, ज्यामध्ये डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल. या SUV मध्ये, 18-इंच अलॉय व्हील आणि हार्डटॉप दिले जातील. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात इलेक्ट्रिक रियर व्ह्यू मिरर (ORVM's), फॉग लॅम्प्स, ब्लॅक बंपर आणि मोल्डेड फूटस्टेप यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.

SUV च्या केबिनमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रुफ माऊंटेड स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखी वैशिष्ट्ये असतील. असे सांगितले जात आहे की, कंपनी याला दोन नवीन रंगांसह सादर करेल, ज्यात एव्हरेस्ट व्हाइट आणि ब्लेझिंग ब्रॉन्झ कलरचा समावेश आहे. कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या XUV300 मध्ये ब्रॉन्झ रंग देण्यात आला होता.

नवीन महिंद्रा थारच्या टू-व्हील ड्राईव्ह व्हेरियंटच्या किंमतीबद्दल लॉन्चपूर्वी काहीही सांगणे कठीण असले तरी तज्ञांचे मत आहे की ही नवीन थार 10 लाख ते 11 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. महिंद्रा थारची सध्याची किंमत 13.59 लाख ते 16.29 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. आता याच्या किमतीबाबत कंपनी काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.